‘बिग बॉस ओटीटी’चे तिसरे पर्व सध्या चर्चांचा भाग बनले आहे. अनिल कपूर( Anil Kapoor) सूत्रसंचालन करत असलेल्या या तिसऱ्या पर्वाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बिग बॉसने स्पर्धकांना दिलेल्या टास्कमुळे, कधी घरातील सदस्यांच्या भांडणामुळे तर कधी घरातील सदस्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे हे पर्व चर्चेत असल्याचे दिसते. आता मात्र बिग बॉसचा हा शो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. जिओ सिनेमाने चुकून या आठवड्यातून कोणता सदस्य घराबाहेर गेला, याची पोस्ट शेअर केली होती.

नेटकरी काय म्हणाले?

जिओ सिनेमाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर विशाल पांड्ये हा स्पर्धक घराबाहेर पडल्याची पोस्ट शेअर केली होती. मात्र, त्यानंतर ही पोस्ट लगेच डिलिट करण्यात आली. मात्र, आता नेटकरी यावर आक्षेप घेताना दिसत आहेत. सोशल मीडियावर या विषयाची मोठी चर्चा होताना दिसत आहे. नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणता स्पर्धक कधी घरी जाणार आहे, हे सगळं बिग बॉसचे व्यासपीठ आधीच ठरवते.

विशाल पांड्ये बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याची पोस्ट पाहिल्यानंतर, विशालची मैत्रीण आलिया हामिदीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, जर ते विशालला बिग बॉस शोमधून काढण्याची योजना करत असतील तर बिग बॉसच्या निर्मात्यांवरील माझा विश्वास उडेल. हा पक्षपाती शो आहे. जर सभ्य लोकांना अशाप्रकारे वागणूक दिली जात असेल, तर पुढच्या पर्वामध्ये लोकप्रिय कलाकार का भाग घेतील, असा मला प्रश्न पडला आहे. जर विशाल बिग बॉसमधून बाहेर पडणार असेल तर मी उर्वरित पर्व बघणार नाही. याबरोबरच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर समीक्षा सूदने “हे खरे नसावे, अशी माझी आशा आहे, या शोला सभ्य लोकांची गरज आहे”, असे तिने म्हटले आहे.

हेही वाचा: पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन ट्विस्ट! बनीला त्याच्या बाबांविषयी गैरसमज होईल का? नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

या आठवड्यात शिवानी कुमारी, लवकेश कटारिया, विशाल पांड्ये घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. विशाल पांड्ये आणि अरमान मलिक या दोघांचे मोठे भांडण झाले होते. त्यावेळी अरमान मलिकने त्याच्या कानाखाली मारली होती व तुला घराबाहेर काढेन अशी धमकी दिली होती. त्यानंतर सोशल मीडियावर विशाल पांड्येला मोठा पाठिंबा मिळाल्याचे पाहायला मिळाले होते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अरमान मलिक आणि कृतिका मलिक या पती-पत्नीचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बिग बॉसच्या कार्यक्रमावर मोठी टीका केली जात होती. आमदार मनीषा कायंदे यांनीदेखील या कार्यक्रमाच्या विरोधात तक्रार करत शो बंद करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर स्पष्टीकरण देताना हा व्हिडीओ छेडछाड करून व्हायरल करण्यात आल्याचं जिओ सिनेमाकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात ‘बिग बॉस ओटीटी’च्या निर्मात्यांनी बुधवारी ( २४ जुलै ) मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम विभागात तक्रार दाखल केली आहे.आता या आठवड्यात कोणता स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.