‘बिग बॉस’ हा भारतातील टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ‘बिग बॉस’ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’चा मोठा चाहता वर्ग आहे. जानेवारीत ‘बिग बॉस’चं १७वं पर्व संपलं. टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ संपलं की आता चाहत्यांना ‘बिग बॉस ओटीटी’ची आतुरता असते. २०२१पासून ‘बिग बॉस ओटीटी’ सुरू झालं. आतापर्यंत दोन पर्व यशस्वीरित्या पार पडले. त्यामुळे चाहते ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाची वाटत पाहत आहेत.
काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व १५ मेपासून सुरू होणार असल्याचं समोर आलं होतं. एवढंच नव्हे तर या पर्वात कोण-कोणते स्पर्धक असणार याची देखील चर्चा सुरू होती. दलजीत कौर, शहजादा धामी, प्रतीक्षा होनमुखे, सना सईद, विकी जैन असे अनेकजण ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात स्पर्धक असल्याचं म्हटलं जातं होतं. पण आता ‘बिग बॉस’च्या चाहत्यांसाठी एक वाईट वृत्त समोर आलं आहे.
हेही वाचा – पूजा हेगडेनं मायानगरी मुंबईत घेतलं नवं आलिशान घर, किंमत वाचून व्हाल थक्क
‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, यंदा ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व रद्द करण्यात आलं आहे. कलर्स टीव्ही व जिओ सिनेमाने ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा ‘बिग बॉस’च्या चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. आता चाहत्यांना ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची वाट पाहावी लागणार आहे.
हेही वाचा – अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व सुरू केलं तर त्यानंतर लगेच ‘बिग बॉस’चा १८वं पर्व सुरू होईल. दोन्ही शोमध्ये फारसे अंतर राहणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांना कंटाळा येऊ शकतो. या कारणामुळे यंदा ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व रद्द करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या वृत्ताला निर्मात्यांनी अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.