‘बिग बॉस ओटीटी’वरील तिसऱ्या पर्वाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. कधी हा कार्यक्रम आपल्या नवनवीन टास्कसाठी चर्चेत असतो; तर कधी स्पर्धकांच्या वक्तव्यांमुळे. आता बिग बॉस ओटीटीवरील तिसऱ्या पर्वातील स्पर्धक पौलोमी दासला अचानक स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्याने ती मोठ्या चर्चेत होती. मात्र आता तिने बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना तिने आपल्या रंगावरून ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.
पौलोमी दास म्हणते की, मला माझ्या रंगावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते. डायन, रात्री तू दिसणार नाहीस, फेअर अॅण्ड लवली लाव, काळी, तू तुझा रंग घासून काढ, तू ब्लिच कर, अशा अनेक कमेंट्स माझ्या रंगावरून केल्या गेल्या आहेत. ज्यांनी मला फेअर अॅण्ड लवली लावण्याचा सल्ला दिला आहे, त्यांना मला हे सांगायचे आहे की मी ‘ग्लो अॅण्ड लवली’चा चेहरा होते, त्या क्रीमच्या जाहिराती. आज मी जी काही आहे, ती माझ्या रंगामुळे आहे. मी याच रंगासोबत जन्मले आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. मी आज कॅमेऱ्यासमोर वेगळी जरी दिसत असले तरी ते दिसणे माझ्या रंगामुळे आहे. मला माझ्या रंगाची अजिबात लाज वाटत नाही. तुम्हाला तसे काही वाटत असेल, तर तो तुमच्या विचाराचा दोष आहे आणि मला फरक पडत नाही की, तुम्ही काय विचार करता याचा. मला माझा रंग साफ करण्याची गरज नसून तुम्हाला तुमचे विचार साफ करण्याची गरज असल्याचे पौलोमी दासने म्हटले आहे.
याबरोबरच तिने तिच्या कपड्यांवरून होणाऱ्या टीकेलादेखील उत्तर दिले आहे. ती म्हणते की, ज्या कपड्यांत वावरणे मला सहज वाटते, ते कपडे मी परिधान करते. मला बिकिनीमध्ये अवघडल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे मी तसे कपडे वापरते. जर तुम्हाला असे कपडे आवडत नसतील, तर तुम्ही ते वापरू नका. मी साडीसुद्धा नेसते, मी सलवार सूटदेखील घालते. मला, माझ्या आई-वडिलांना माझ्या कपड्यांबद्दल कोणतीही अडचण नाही; मग तुम्हाला का आहे? महत्त्वाचे म्हणजे कोणीही माझ्याकडून प्रेरणा घ्यावी, असा माझा प्रयत्न नसतो. मला जे आवडते, ते मी परिधान करते, असे म्हणत पौलोमी दासने सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांना एक टास्क दिला होता. या टास्कमध्ये पौलोमी दास, चंद्रिका दीक्षित, मुनीषा खटवानी, शिवानी कुमारी, नॅजी व विशाल पांडे घरातून बाहेर होण्यासाठी नॉमिनेट झाले. तो टास्क करून, चंद्रिका दीक्षित, शिवानी कुमारी, नॅजी व विशाल घराबाहेर जाण्यापासून वाचले. मात्र, हा टास्क पूर्ण करू न शकलेल्या पौलोमी व मुनीषा यांच्यामधून एका स्पर्धकाला एलिमिनेट करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार लव्ह कटारिया याला मिळाला होता. लव्ह कटारियाने पौलोमीचे नाव घेतल्याने तिला ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वातून बाहेर जावे लागले आहे.