Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाला २१ जूनपासून धमाकेदार सुरुवात झाली आहे. अभिनेते अनिल कपूर यंदाच्या पर्वाचं होस्टिंग करत आहेत. ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाच्या सुरुवातीलाच एक नवीन गोष्ट पाहिला मिळाली ते म्हणजे स्पर्धकांना त्यांच्या फोन वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण यात एक ट्विस्ट आहे. एकूण १६ स्पर्धक असून यामधील एक स्पर्धक बाहेरचा आहे. हा एक स्पर्धक बाहेरच्या जगात सुरू असलेल्या गोष्टी ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांपर्यंत पोहोचवणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या एका स्पर्धकाला एलिमिनेट केलं जाणार नाहीये. ही सुवर्ण संधी सना सुलतानला देण्यात आली आहे. त्यामुळे आता या संधीचा फायदा ती कसा उचलते? हे येत्या काळात समजेल. पण तत्पूर्वी या पर्वातील चर्चित अशी दिल्लीची वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षितने दिवसाच्या कमाईचा खुलासा केला आहे.
‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात सना मकबूल, पौलोमी दास, विशाल पांडे, सना सुलतान, चंद्रिका दीक्षित, दीपक चौरसिया, साई केतक राव, नीरज गोयत, शिवानी कुमारी, लव कटारिया, नेझी, मुनिषा खटवानी, अरमान मलिक, पायल मलिक, कृतिका मलिक आणि रणवीर शौरी हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. या पर्वात एन्ट्री करताच चंद्रिकाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत. भंडारा प्रकरणी पोलिसांबरोबर झालेल्या वादाविषयी चंद्रिका बोलली आहे. तसंच दिवसाला ती किती कमावते याचा आकडा देखील तिने सांगितला आहे. हा आकडा ऐकून ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांसह प्रेक्षकही थक्क झाले.
चंद्रिकाने सांगितले की, “मी दिल्लीतील रस्त्यावर वडापाव विकून दिवसाला ४० हजार रुपये कमावते.” पुढे ती ट्रोलिंगविषयी म्हणाली, “लोक कमेंट करतात, हे त्यांचं काम आहे. पण अनेकजण समोरच्या व्यक्तीच्या संघर्षांबद्दल किंवा त्यामागे घडलेल्या गोष्टीबद्दल जाणून न घेता भाष्य करतात.”
दरम्यान, ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व २१ जूनपासून रात्री ९ वाजता ‘जिओ सिनेमा’वर प्रसारित होत आहे. मागील दोन पर्व जिओ सिनेमावर मोफत होते. पण आता ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत.