बिग बॉस ओटीटीचे तिसरे पर्व सध्या चांगलेच गाजताना दिसत आहे. अनिल कपूर सूत्रसंंचालन करीत असलेला हा सीजन कधी स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे, तर कधी बिग बॉस (Bigg Boss Ott)ने दिलेल्या टास्कमुळे, तर कधी स्पर्धकांमधील भांडणामुळे सतत चर्चेत असतोच. मात्र, एका स्पर्धकामुळे हा शो अधिक चर्चेत आला आहे.
‘वडापाव गर्ल’ म्हणजेच चंद्रिका दीक्षित नुकतीच घराबाहेर पडली असून, अदनान शेखची घरात एंट्री झाली होती. मात्र, आल्यानंतर लगेच त्याने बिग बॉसच्या घरतील नियम मोडल्याने त्याला पहिल्याच दिवशी घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
Bigg Boss Ott 3 चा कोणता नियम अदनान शेखने मोडला?
बिग बॉसच्या घरात येणाऱ्या स्पर्धकांसाठी काही नियम असतात. हे नियम मोडल्यास त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागते. बिग बॉसच्या घराबाहेरील घडामोडी नवीन आलेल्या सदस्याने घरात असलेल्या जुन्या सदस्यांना सांगू नयेत, असा हा नियम आहे. मात्र, वाइल्ड कार्ड स्पर्धक अदनान शेखने घरात आल्याबरोबर टी-२० विश्वचषकामध्ये झालेला भारताचा विजय आणि नवीन प्रदर्शित झालेले चित्रपट यांच्याविषयी माहिती देण्यास सुरुवात केली. बिग बॉसने असे न करण्याबाबत वारंवार सूचना देऊनदेखील त्याने बाहेरच्या जगातील गोष्टी सांगणे सुरूच ठेवले. त्यामुळे बिग बॉसने घरातील महत्त्वाचा नियम मोडल्याबद्दल अदनान शेखला पहिल्याच दिवशी घरचा रस्ता दाखवला. बिग बॉसने म्हटले, “तुला हा खेळ खेळण्यापेक्षा बाहेरच्या जगातील गोष्टी लोकांना सांगण्यातच जास्त मजा येत आहे. तुझ्यापेक्षा वर्तमानपत्र हे काम चांगल्या रीतीनं करील. तेव्हा या क्षणी तू घराच्या मुख्य प्रवेशदारातून बाहेर पड.” बिग बॉसने सुनावलेल्या निर्णयानंतर अदनान शेखने माफी मागितली; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याला आल्या पावली बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे.
बिग बॉसचे हे तिसरे पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. काही दिवसांपासून अरमान मलिकने विशाल पांडेला कानाखाली मारल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत होती. बाहेर असलेल्या अनेक टीव्ही कलाकारांनी आणि बिग बॉसच्या मागील पर्वातील सदस्यांनी अरमान मलिकला त्यासाठी शिक्षा देण्याची आणि घरातून बाहेर काढण्याची मागणी केली होती. मात्र बिग बॉसने कोणतीच क्शन न घेतल्याने अनेकांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला होता.
हेही वाचा: ‘सरदार २’ च्या सेटवर अपघात, २० फूट उंचावरून पडल्याने स्टंटमॅनचे झाले निधन
त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच लाइव्ह फीडमध्ये लव कटारियाच्या पाठीमागे साप असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर नेटकऱ्यांनी घरातील सदस्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण केला होता. आता बिग बॉसच्या या पर्वात कोणता सदस्य प्रेक्षकांचे मन जिंकत ट्रॉफी आपल्या नावावर करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd