देओल कुटुंबीयांसाठी २०२३ हे वर्ष सर्वार्थाने खास ठरलं. सनी देओलच्या मुलाचं लग्न, ‘गदर २’, ‘अॅनिमल’ चित्रपटाचं यश यानंतर देओल ब्रदर्सच्या आयुष्यात भरभराटीचे दिवस आले. सनी आणि बॉबी देओल यांनी नुकतीच ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी आयुष्यातील कठीण प्रसंगांची आठवण काढल्यावर बॉबी देओल भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
रणबीर कपूर, रोहित शर्मा, आमिर खान यांच्यानंतर आता कपिल शर्माच्या शोमध्ये देओल ब्रदर्स उपस्थित राहणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटील आला. दोन्ही भावांनी या शोमध्ये आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मोठा भाऊ सनी देओलने खडतर काळातील आठवणींबद्दल सांगितल्यावर बॉबी देओलला अश्रू अनावर झाले.
“एक काळ असा आला होता, जेव्हा आमच्या घरी काय सुरुये आमच्या काहीच लक्षात येत नव्हतं. आमचं कुटुंब १९६० पासून लाइमलाइटमध्ये होतं. परंतु, त्यानंतर आयुष्यात अनेक चढउतार आले. आम्हाला काहीच समजलं नाही. अशातच माझ्या मुलाचं लग्न झालं. त्यानंतर बाबांचा सिनेमा ( रॉकी और रानी की प्रेम कहानी ) चालला. मग, ‘गदर २’ प्रदर्शित झाला. देवाच्या कृपेने आमचे सगळे दिवस बदलले आणि वर्षाच्या शेवटी आलेल्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवलं” असं सनी देओलने या कार्यक्रमात सांगितलं.
आपल्या मोठ्या भावाने जागवलेल्या आठवणी ऐकून बॉबी देओलला अश्रू अनावर झाले. तो प्रचंड भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. सध्या बॉबीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी देओल कुटुंबात असलेल्या या सुंदर अशा बॉण्डिंगचं भरभरून कौतुक केलं आहे.