बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खानचं आता सिनेसृष्टीत पदार्पण झालं आहे. त्याचा पहिला वहिला चित्रपट ‘महाराज’ १४ जूनला नेटफ्किक्सवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी पोस्टरवरून विश्व हिंदू परिषदेची युवा संघटना बजरंग दलने आक्षेप घेतला होता. पोस्टरमधून एका हिंदू धार्मिक नेत्याची व्यक्तिरेखा नकारात्मक स्वरुपात दाखवली जात आहे. त्यामुळे विशिष्ट वर्गाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थितीही निर्माण होऊ शकते. म्हणून प्रदर्शनापूर्वी चित्रपट बजरंग दलला दाखवण्यात यावा अशी मागणी पत्राद्वारे केली होती. पण ‘महाराज’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटातील जुनैदच्या अभिनयाचं कौतुक होतं आहे. शिवाय अभिनेता जयदीप अहलावतच्या कामाचं विशेष कौतुक केलं जात आहे.
‘महाराज’ चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता जयदीप अहलावतने खूप मेहनत घेतली आहे. नुकतंच त्यानं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधील त्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते चकित झाले आहेत. त्याच्या या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
जयदीप अहलावतने ‘महाराज’ चित्रपटासाठी पाच महिन्यात २६ किलो वजन घटवलं आहे. १०९.७ किलो वजन असलेल्या जयदीपने ८३ किलो वजन केलं आहे. वयाच्या ४४व्या वर्षी अभिनेत्याने एवढं वजन ‘महाराज’ चित्रपटासाठी घटवलं आहे. त्याचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून कलाकार मंडळींसह चाहते कौतुक करत आहेत.
अभिनेत्री रिचा चड्ढा, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ, विनीत सिंग, अशा अनेक कलाकारांनी त्याचं कौतुक केलं आहे. सिद्धार्थ मल्होत्राने प्रतिक्रिया देत लिहिलं आहे, “या भूमिकेकरिता तू घेतलेल्या मेहनतीसाठी शब्द नाहीत.”
दरम्यान, महाराज लायबल केसवर ‘महाराज’ चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात जुनैद मुख्य भूमिकेत असून त्याच्या विरोधात जयदीप खलनायक दाखवण्यात आला आहे. ‘महाराज’मध्ये आमिर खानच्या मुलाने पत्रकार करसनदास मुलजी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तर जयदीप चित्रपटात महाराजच्या भूमिकेत झळकला आहे.