कोविड काळानंतर ओटीटीवरील कंटेंट बघणाऱ्या लोकांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. असाच एक उत्तम आणि परवडणारा ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे एमएक्स प्लेअर. सुरुवातीला फक्त व्हिडिओ प्लेअर म्हणून वापरल्या जाणाऱ्या या प्लॅटफॉर्मचं रूपांतर भारतातील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये झालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आश्रम, भौकालसारख्या कित्येक उत्तमोत्तम सीरिज या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्या. आता अशीच आणखी एक आगामी सीरिज या प्लॅटफॉर्मवर लवकरच येणार आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि तिथली गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ‘धारावी बँक’ या वेबसीरिजचा ट्रेलर नुकताचा प्रदर्शित झाला या ट्रेलरमधून धारावीमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी उलगडणार आहे.

या शोद्वारे डिजिटल पदार्पण करणारे सुनील शेट्टी ‘थलायवन’ म्हणजेच – धारावी बँकेचा सर्वेसर्वा म्हणून दिसणार आहे. याबरोबरच विवेक आनंद ओबेरॉय याने साकारलेल्या जेसीपी जयंत गावस्कर या पात्राने धारावीमधील हे साम्राज्य रसातळाला नेण्याचा निर्धार केला आहे. ट्रेलर आपल्याला धारावी झोपडपट्टीच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या एका मोठ्या गुन्हेगारी विश्वाची झलक आणि त्या ३०००० गल्ल्यांमध्ये लपलेले ३०००० कोटी रुपयांचे अकल्पनीय आर्थिक साम्राज्य शोधण्याचा रोमांचकारी पाठलाग दाखवतो. थलायवन आणि जेसीपी जयंत गावस्कर यांची ही लढाई कुटुंबासाठी, सन्मानासाठी, सत्तेसाठी आणि कर्तव्यासाठी आहे. पण या लढाईत विजय कोणाचा होणार हे सीरिज प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

आणखी वाचा : विश्लेषण: ‘कॉन्ट्रॅक्ट चीटिंग’.. विदेशात चर्चेत आहे परीक्षेत कॉपीचा हा प्रकार! हे नेमकं आहे तरी काय? कुठे होतो वापर?

थलायवन या भूमिकेबद्दल बोलताना सुनील शेट्टी म्हणाला “मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःसाठी आदर मिळवायलाच पाहिजे आणि हे कसे केले जाते याचे परिपूर्ण उदाहरण म्हणजे थलायवन. तो सामर्थ्यवान, निर्दयी आहे आणि धारावीचे लोक ज्यांना तो त्याचे कुटुंब मानतो त्यांची सर्वात जास्त काळजी करणारा आहे. ‘मेरे फॅमिली को टच नही करना का’ हा त्यांचा कानमंत्र एक व्यक्ती म्हणूनही माझ्यासाठी खूप जवळचा आहे. ही सीरिज करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ओटीटीविश्वात काम करताना तुम्ही व्यक्तिरेखेच्या खोलवर जाऊन ती व्यक्तिरेखा आपलीशी करू शकता आणि थलायवन ही भूमिका माझ्यासाठी एक परिपूर्ण डिजिटल पदार्पण आहे.”

समीत कक्कड यांनी या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं असून सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, नागेश भोसले, चिन्मय मांडलेकरसारखे मराठी कलाकारही यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. १९ नोव्हेंबरला ही वेबसीरिज एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor suniel shetty shares his experience of working in ott series dharavi bank avn
Show comments