अभिनेत्री सुश्मिता सेनची बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘ताली’ ही वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित झाली. मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी ही वेबसीरिज प्रदर्शित झाली. ही वेबसीरिज तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्यावर आधारित आहे. यात गौरी सावंत यांची भूमिका अभिनेत्री सुश्मिता सेनने साकारली आहे. नुकतंच तिच्या पात्राबद्दल रवी जाधव यांनी खुलासा केला आहे.
‘ताली’ या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री सुश्मिता सेन ही गौरी सावंत हे पात्र साकारत आहे. यात सुश्मिता सेन ही तृतीयपंथीयांच्या वेशात दिसत आहे. यावेळी तिच्या कपाळावर मोठी टिकली, साडी आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ पाहायला मिळत आहे. या रुद्राक्षाच्या माळेबद्दल दिग्दर्शक रवी जाधव यांनी एक किस्सा सांगितला आहे.
आणखी वाचा : “…बस इतकेच”, सुश्मिता सेनची ‘ताली’ वेबसीरिज पाहिल्यानंतर सुबोध भावेची पोस्ट, म्हणाला “रवी जाधव तुझ्या…”
“आम्ही चित्रपटाचे शूटींग करत असताना गौरी सावंत यांच्याकडे एक रुद्राक्षची माळ होती. ती माळ त्यांनी काढली आणि सुश्मिता सेनला आशीर्वाद म्हणून दिली. त्यावेळी त्या म्हणाल्या ‘ही माळ कायम सोबत ठेव.'”
“आम्ही जेव्हा याची स्क्रिप्ट लिहिली होती किंवा स्क्रीनप्ले लिहिला तेव्हा त्यात कुठेच या माळीबद्दल उल्लेख नव्हता. पण गौरी यांनी सुश्मिताला ती माळ दिली आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा सुश्मिताने गौरी हे पात्र साकारलं, तेव्हा कायमच ती माळ गळ्यात घातली”, असे रवी जाधव यांनी सांगितले.
दरम्यान ‘ताली’ या वेबसीरिजचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. तर याचे लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले आहे. ही वेबसीरिज जिओ सिनेमावर १५ ऑगस्टला प्रदर्शित झाली. यात सुष्मिता सेन ही प्रमुख भूमिका साकारत आहे.