या नवीन वर्षीसुद्धा बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड चित्रपट फारसे कमाल दाखवू शकलेले नाहीत. शाहरुख खानचा ‘पठाण’ सोडला तर इतर बॉलिवूड चित्रपट सपशेल आपटलेच आहेत. १३ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या आसमान भारद्वाज दिग्दर्शित ‘कुत्ते’ या चित्रपटाचीसुद्धा काही अशीच गत झाली. एकाहून एक सरस कलाकार असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
शिवाय या चित्रपटाच्या काही दिवस आधीच रितेश आणि जिनीलियाचा ‘वेड’ प्रदर्शित झाला होता आणि यामुळेच कदाचित या ‘कुत्ते’ चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असं म्हंटलं जातं. ‘कुत्ते’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी फक्त १ कोटी ४० लाख रुपये इतपत कमाई केली. अपेक्षेपेक्षा ही कमाई खूपच कमी ठरली. एकूण ८० कोटी रुपयांचा बजेट असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचू शकला नाही. शिवाय बऱ्याच महिन्यांनतर अर्जून कपूरही रुपेरी पडद्यावर परतला. मात्र या चित्रपटातूनही त्याला प्रेक्षकांचं मन जिंकता आलेलं नाही.
आणखी वाचा : नवा क्रेडिट कार्ड घोटाळा आला उघडकीस; अभिषेक बच्चन, आलिया भट्टसह कित्येक सेलिब्रिटीज अडचणीत
बॉक्स ऑफिसवर दणकून आपटलेला हा ‘कुत्ते’ चित्रपट आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे. येत्या १६ मार्चला हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट १६ तारखेपासून पाहायला मिळणर आहे. मध्यंतरी आयुष्मान खुरानाचा ‘अॅन अॅक्शन हीरो’ हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला पण नेटफ्लिक्सवर तो लोकांना पसंत पडला.
अशीच गोष्ट कदाचित ‘कुत्ते’ या चित्रपटाच्या बाबतीत होऊ शकते, बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल न दाखवू शकलेला हा चित्रपट आता ओटीटीवर नेमकी कशी कामगिरी करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर, तब्बू, राधिका मदान, कोंकणा सेन शर्मा, नसीरुद्दीन शाह, यांच्यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.