Chhaava OTT Release Update : छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘छावा’ हा २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शित होऊन ३५ दिवस झाले आहेत, तरीही चित्रपट थिएटरमध्ये चालत आहे. इतकंच नाही तर ‘छावा’ अनेक सिनेमांच्या कमाईचे रेकॉर्ड्स मोडत आहे.
विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. तुम्ही जर हा सिनेमा थिएटरमध्ये पाहिला नसेल तर लवकरच तुम्हाला घरी बसून ‘छावा’ पाहता येणार आहे. ‘छावा’च्या ओटीटी रिलीजबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. ‘छावा’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर केव्हापासून पाहता येईल, ते जाणून घेऊयात.
केव्हा, कुठे पाहता येईल ‘छावा’?
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, ‘छावा’ थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला जाईल. ‘छावा’ नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ११ एप्रिल २०२५ रोजी रिलीज होईल. मात्र, चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत अधिकृत पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही.
‘छावा’ हा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटात विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर रश्मिका मंदाना त्यांच्या पत्नी महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंह, डायना पेंटी, संतोष जुवेकर, निलकांती पाटेकर, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
‘छावा’ चे ३५ दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
Chhaava box office collection day 35: ‘छावा’ एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून चित्रपटगृहात चालतोय. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये अजुनही उत्सुकता दिसतेय. या चित्रपटाने रिलीजच्या ३५व्या दिवशी दमदार कमाई केली आहे. चित्रपटाचे ३५ व्या दिवसाचे कलेक्शन २.३५ कोटी रुपये आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या माहितीनुसार ‘छावा’चे भारतातील कलेक्शन ५७२.९५ कोटी रुपये झाले आहे. तर चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन सध्या ७७०.५ कोटी रुपये आहे.
दरम्यान, बॉक्स ऑफिस गाजवणारा ‘छावा’ सिनेमा पायरसीचा बळी ठरला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.