आपल्या देशात आजही सेक्सबद्दल बोलताना लोक अवघडतात. अनेकांना याबद्दल उघडपणे बोलण्यात संकोच वाटतो. त्यामुळेच शाळेतही हा विषय मुलांना व्यवस्थित समजावून सांगितला जात नाही. पण आता लैंगिक शिक्षण हे शालेय वयात किती महत्त्वाचं आहे यावर भाष्य करणारा एक चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘छत्रीवाली.’ नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने या चित्रपटातून शालेय वयात लैंगिक शिक्षण किती गरजेचं आहे हे सांगण्यासाठी पुढाकार घेतला आहे. चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारताना दिसतेय. या चित्रपटात ती कुठलाही आडपडदा न ठेवता अगदी स्पष्टपणे या विषयावर बोलताना दिसणार आहे.
आणखी वाचा : Video: …अन् सारा अली खान रितेश देशमुखशी चक्क मराठीत भांडू लागली, व्हिडीओ व्हायरल
या ट्रेलरच्या सुरुवातीलाच शिक्षक मुलांना माणसांच्या प्रजनन प्रक्रियेबद्दल शिकवताना दिसतात. परंतु एक मुलगा त्यांना जेव्हा सेक्सबद्दल प्रश्न विचारतो तेव्हा त्याचे उत्तर देण्यात ते टाळतात. अशातच या ट्रेलरमध्ये रकुल प्रीत सिंगची एन्ट्री होते. ती अत्यंत बिनधास्त आणि स्पष्टव्यक्ती दाखवलेली आहे. कंडोम न वापरल्यामुळे वहिनीचा दोनदा गर्भपात करण्यात आला ही गोष्ट तिला कळते.
त्याचप्रमाणे तिच्या भाचीचा अभ्यास घेताना लैंगिक विषयाबाबतचे प्रश्न परीक्षेत सक्तीचे नसतात हेही तिला कळतं. परंतु यात मुलांचं नुकसान आहे आणि त्यामुळे ते भविष्यात चुका करू शकतात. त्यामुळे ती शाळेत लैंगिक शिक्षण सक्तीचे करण्याची मागणी मुख्याध्यापकांकडे करते. पण ते तिचं बोलणं गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे ती स्वतः याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी पाऊलं उचलते. पण आता यात तिला किती यश येतं आहे हे चित्रपट पाहूनच कळेल.
हेही वाचा : व्हॉट अ डेडिकेशन! रकुल प्रीत सिंगने तब्बल ११ तास सलग पाण्यात केलं शूटिंग, म्हणाली, “आतापर्यंत मी…”
चित्रपटात तिच्याबरोबर सुमित व्यास, सतीश कौशिक, डॉली अहलूवालिया, राजेश तेलंग, प्राची शाह पांड्या, राकेश बेदी आणि रीवा अरोरा हे कलाकारही पूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देवस्कर त्यांनी केलं असून हा चित्रपट २० जानेवारी रोजी ‘झी 5’वर प्रदर्शित होईल.