बॉलिवूड चित्रपटांमध्ये अश्लीलता, नग्नता आहे असे आरोप सध्या बरेच लागत आहेत. पण ८० आणि ९० च्या दशकात असे चित्रपट बनवणारी एक समांतर चित्रपटसृष्टी तेव्हा बॉलिवूडमध्ये कार्यरत होती. डबल मिनिंग जोक, बोल्ड सीन्स आणि हॉरर सीन्ससह त्यावेळी बरेच चित्रपट बनवले जायचे ज्यांना ‘बी ग्रेड सिनेमा’ म्हणूनही ओळखलं जायचं.
यामध्ये प्रामुख्याने हॉरर आणि अडल्ट चित्रपट यांचा समावेश असायचा ज्यांना आजच्या भाषेत ‘बिलो द बेल्ट’ असंही म्हणतात. धर्मेंद्रपासून राजेश खन्नापर्यंतच्या सुपरस्टार्सनाही अशा चित्रपटात काम करण्याचा मोह आवरता आलेला नाही. याच ‘बी ग्रेड चित्रपट’विश्वावर एक माहितपट लवकरच प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे.
आणखी वाचा : ओळखा पाहू बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री कोण? सलमान खानबरोबर दिलेत बरेच सुपरहीट चित्रपट
‘सिनेमा मरते दम तक’ नावाचा एक माहितीपट लवकरच प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ६ भागांच्या या सिरिजमध्ये तेव्हाच्या ‘बी ग्रेड चित्रपट’विश्वाबद्दलच्या बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या प्रकारच्या चित्रपटात नेमकं कशा पद्धतीने काम व्हायचं? कोण हे चित्रपट करण्यात माहिर होतं? याविषयी माहिती मिळणार आहे. त्या काळात असे चित्रपट सुपरहीट करून दाखवणारे दिग्दर्शक जे नीलम, विनोद तलवार, दिलीप गुलाटी, किशन शाह ही मंडळी यात त्यांचे अनुभव शेअर करणार आहेत.
याबरोबरच या माहितीपटात रजा मुराद, मुकेश ऋषि, राखी सावंत, हरिष पटेल, यांच्यासारखे बॉलिवूडमधले नावाजलेले कलाकारही यात दिसणार आहेत. शिवाय बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसुद्धा या माहितीपटात दिसणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक वसन बाला आणि दिशा रंडानी हे हा माहितीपट आपल्यासमोर सादर करणार आहेत. २० जानेवारीपासून ही सीरिज प्राइम व्हिडिओवर पाहायला मिळणार आहे.