अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या तिच्या हॉलीवुड प्रोजेक्ट्समुळे खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिची ‘सिटाडेल’ ही वेब सिरीज ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’वर प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सिरीजच्या घोषणेपासूनच याबद्दल सर्वत्र चर्चा होती. तर आता या सिरीजला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तर आता या सिरिजबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे.
‘सिटाडेल’ या वेब सिरिजच्या हिंदी व्हर्जनमध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सध्या ते या सिरिजच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. ‘सिटाडेल’चं हॉलीवूड व्हर्जन प्रदर्शित झाल्यावर आता या बॉलीवूड व्हर्जनमध्ये काय दिसणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तर आता या सिरिजमध्ये समांथा साकारत असलेल्या भूमिकेबद्दल वेगळ्याच चर्चा रंगू लागल्या आहेत.
‘सिटाडेल’च्या हिंदी व्हर्जनमधील समांथाची भूमिका कशी असेल हे अजून गुप्त ठेवण्यात आलं असलं तरीही ‘सिटाडेल’च्या हॉलीवूड व्हर्जनच्या पाचव्या भागात समांथा रुथ प्रभू ही या सिरिजमध्ये प्रियांका चोप्राच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहे असे संकेत मिळाले आहेत. या भागातील एका सीनमध्ये प्रियांका चोप्रा साकारत असलेल्या नादिया या पात्राला एका व्यक्तीचा फोन येतो. ही व्यक्ती म्हणजे तिचे वडील राही गंभीर. ही भूमिका वरुण धवन साकारणार असून त्याच्या पत्नीची म्हणजेच नादियाच्या आईची भूमिका समांथा रूथ प्रभू साकारताना दिसणार आहे असं बोललं जाऊ लागलं आहे.
‘सिटाडेल’च्या पाचव्या भागात मिळालेल्या या हिंटमुळे समांथा रूथ प्रभूचे चाहते खुश झाले आहेत. पण अद्याप याबद्दल या सिरिजच्या निर्मात्यांनी किंवा दिग्दर्शकांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे आता या आगामी सिरिजची उत्सुकता आणखीनच वाढलेली आहे.