बहुचर्चित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकारण व सत्तासंघर्षावर आधारित असलेल्या या वेब सीरिजचे दोनही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. आता या सीरिजच्या तिसऱ्या सीझनसाठी प्रेक्षक आतुर आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘सिटी ऑफ ड्रीम्स ३’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. आता या सीरिजच्या तिसऱ्या सीझनचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘सिटी ऑफ ड्रीम्स ३’च्या नव्या प्रोमोमध्ये सचिन पिळगावकर काही डायलॉग घेताना दिसत आहेत. “साहेबांच्या निवृत्तीचा काही भरवसा नाही. राजकारणात प्रत्येकाला स्वत:चा विचार करावाच लागतो. पक्ष व साहेब दोघांचीही मी खूप सेवा केली. पण साहेब त्यांच्या मुलीलाच मेवा देणार. इमानदारी फक्त कुत्र्यांनीच करावी. राजकारणात कोणीही कोणाचे पाय दाबण्यासाठी नाही तर सत्तेसाठी येतात. मग यासाठी तुम्हाला कोणाचे पाय दाबावे लागू दे अथवा गळा,” असं म्हणताना दिसत आहे.
‘सिटी ऑफ ड्रीम्स ३’चा नवा प्रोमो सध्या चर्चेत आहे. या नव्या प्रोमोने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारच्या ऑफिशिअल सोशल मीडियावरुन हा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘सिटी ऑफ ड्रीम्स ३’ वेब सीरिजमध्ये अभिनेत्री प्रिया बापट, सचिन पिळगावकर, एजाज खान, अतुल कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. २६ मे रोजी ‘सिटी ऑफ ड्रीम्स ३’ हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. हिंदी व मराठी अशा दोन भाषांमध्ये ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.