विनोदवीर सुनील ग्रोवर सध्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये आपलं विनोदी कौशल्य सादर करत आहे. सुनील नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या पात्रांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसलाय. या शोमधलं डफली नावाचं त्याचं पात्र खूप प्रसिद्ध झालं.
डफली या पात्रासाठी सुनील साडी नेसून स्त्रियांच्या वेशात येतो आणि प्रेक्षकांना खळखळून हसवतो. पण, जरी प्रेक्षकांना डफली हे पात्र आवडत असलं तरी प्रसिद्ध कॉमेडीयन सुनील पाल यांना हे सगळं खूप घृणास्पद वाटतं. याबद्दल सुनील पालने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
‘टाईम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील पाल फक्त सुनील ग्रोवरबद्दल नाही तर कपिल शर्मा आणि त्याच्या शोबद्दलदेखील खूप काही बोलला आहे. सुनील पाल मुलाखतीत म्हणाला, “सुनील ग्रोवर मुलींसारखा अभिनय करतो आणि लोकांच्या मांडीवर जाऊन बसतो. तो स्त्रियांचे कपडे घालतो आणि गलिच्छ काहीतरी बोलत असतो, यामुळे ते सगळं खूप घृणास्पद वाटतं.”
हेही वाचा… “माझं तुझ्यावर खूप प्रेम…”, अभिनेत्री अनुषा दांडेकरची भूषण प्रधानसाठी खास पोस्ट, म्हणाली…
सुनील पाल पुढे म्हणाला, “स्त्रियादेखील एवढ्या हपापलेल्या नसतात जेवढा या शोमध्ये सुनील ग्रोवरला दाखवलं आहे. कपिलच्या शोमध्ये हे सगळं दाखवण्यापेक्षा खरे विनोद दाखवले तर बरं होईल. “
सुनील पालने असंदेखील सांगितलं की, “नेटफ्लिक्स ॲडल्ट आणि गलिच्छ कॉन्टेन्टसाठी ओळखलं जातं.” सुनीलला याचा धक्का बसलाय की नेटफ्लिक्सने कपिल शर्माला त्याचा शो या प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्याचं आमिष कसं दिलं.
हेही वाचा… उर्फी जावेदने खरंच केलंय टक्कल? व्हायरल झालेला फोटो पाहून नेटकरी म्हणाले…
सुनील पुढे म्हणाला, “४० लेखक असतानाही ते काहीच चांगलं करू शकले नाहीत. शोमध्ये सगळेच थकलेले वाटतात, कोणाचा उत्साह दिसूनच येत नाही.”
“कपिल वन मॅन शो आहे आणि हा शो टीव्हीवर परत लागायला पाहिजे”, असंही सुनील पाल म्हणाला. कपिल शर्माच्या चाहत्यांनाही हा कार्यक्रम टीव्हीवर लागावा असं वाटतं.
दरम्यान, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चे एपिसोड्स दर शनिवारी आणि रविवारी नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येतात. या शोमध्ये कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवरसह राजीव ठाकूर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक हे कलाकार आहेत; तर अर्चना पुरण सिंगदेखील या शोमध्ये आहेत.