Criminal Justice Season 4 : ओटीटी विश्वातील काही लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेते पंकज त्रिपाठी. आजवर अनेक गाजलेल्या आणि लोकप्रिय वेब सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. त्यांच्या काही गाजलेल्या सीरिजपैकी एक म्हणजे ‘क्रिमिनल जस्टिस.’ त्यांच्या ‘क्रिमिनल जस्टिस’ या सीरिजला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं आहे. आतापर्यंत या सीरिजचे तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून नुकताच चौथ्या भागाचा टीझरही समोर आला आहे. शिवाय या टीझरसह सीरिजच्या प्रदर्शनाची तारीखही शेअर करण्यात आली आहे.

‘क्रिमिनल जस्टिस’च्या चौथ्या भागामधून माधव मिश्रा (पंकज त्रिपाठी) कोर्टात एका खुनाचे गूढ उलगडताना दिसणार आहे. पण, हे प्रकरण इतकं सोपं नाही. या हत्येचे धागेदोरे एका प्रेमकथेशी जोडलेले असल्याचे या टीझरमधून दिसत आहे, त्यामुळे सीरिजच्या या चौथ्या भागाची कथा थोडी मोठी, गंभीर आणि तितकीच रहस्यमय असणार असल्याचं कळत आहे. ‘जिओ हॉटस्टार’च्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे या सीरिजचा टीझर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या टीझरच्या सुरुवातीला एक महिला माधव मिश्राच्या दारात उभी राहून “मला वकील हवा आहे” असे म्हणताना दिसते. पुढे माधव मिश्रा “हे प्रकरण दिसते तितके सोपे नाही, अन्यथा ते माझ्यापर्यंत आले नसते” असं म्हणतो. माधव मिश्राच्या या वाक्यावरूनच या सीरिजमधून पुन्हा एकदा नवा आणि तितकाच आव्हानात्मक विषय प्रेक्षकांना पाहता येणार असल्याचे कळत आहे. या चौथ्या भागामधून एका कुटुंबाशी संबंधित प्रकरण सोडवले जाणार असले तरी या कथेला प्रेम, विश्वासघात आणि खून असे संबंधित अनेक कंगोरे आहेत.

या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी यांच्यासह मोहम्मद जीशान अय्युब, सुरवीन चावला, मीता वशिष्ठ, आशा नेगी, श्वेता बसू प्रसाद, खुशबू अत्रे आणि बरखा सिंग हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत पाहायला मिळणार आहेत. पुढच्या महिन्यात म्हणजेच २२ मे २०२५ रोजी ‘जिओ हॉटस्टार’ या ओटीटी माध्यमावर ‘क्रिमिनल जस्टिस’चा चौथा भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या आगामी भागानिमित्त पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, या सीरिजच्या पहिल्या भागामध्ये विक्रांत मॅसी आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर २०२० मध्ये ‘क्रिमिनल जस्टिस’चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर २०२२ मध्ये सीरिजचा तिसरा भाग प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता तीन वर्षांनी याच लोकप्रिय सीरिजचा चौथा भागही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे