चित्रपटगृहात प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे ओटीटीवर पुन्हा प्रदर्शित होतात. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना एखादा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही, त्यांना तो सिनेमा ओटीटी माध्यमांवर बघण्याची संधी मिळते. आता प्रचंड गाजलेला डाकू महाराज हा दाक्षिणात्य चित्रपट लवकरच ओटीटीवर येणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. आता जाणून घेऊ हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर व कधी प्रदर्शित होणार आहे.

‘डाकू महाराज’ चित्रपट कधी व कुठे पाहायला मिळणार?

नंदमुरी बालकृष्ण यांच्या डाकू महाराज या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. १२ जानेवारी २०१५ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्स इंडियाने इन्स्टाग्राम हॅण्डलवर या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये नंदमुरी बालकृष्ण, बॉबी देओल व इतर काही कलाकार दिसत आहेत. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याचा खुलासा करताना लिहिले की २१ फेब्रुवारीपासून नेटफ्लिक्सवर डाकू महाराज हा सिनेमा पाहा.

चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी बोलायचे, तर या चित्रपटाने फक्त चार दिवसांत बजेट वसूल केले. ‘डाकू महाराज’ १०० कोटींच्या बजेटमध्ये बनवला गेला होता. चार दिवसांत संपूर्ण जगभरात या चित्रपटाने १०० कोटींची कमाई केली. या चित्रपटाने १५० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. नंदमुरी बालकृष्ण यांच्या करिअरमधील सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक हा ‘डाकू महाराज’ चित्रपट आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य कलाकारांबरोबरच बॉबी देओल, उर्वशी रौतेला हे बॉलीवूड कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. प्रज्ञा जायस्वाल, श्रद्धा श्रीनाथ हे कलाकारही इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साई सौजन्या व नागा वामसी यांनी केली आहे. या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार एस. थमनन यांनी संगीत दिले आहे. ‘डाकू महाराज’ बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर नंदमुरी बालकृष्ण यांनी आनंद व्यक्त करीत एस. थमनला खास भेट म्हणून पोर्श कार दिली आहे. त्या कारची किंमत जवळजवळ दोन कोटी असल्याचे म्हटले जात आहे. आता या चित्रपटाला ओटीटीवर कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader