दाक्षिणात्य अभिनेता नानी व अभिनेत्री किर्ती सुरेश मुख्य भूमिकेत असलेल्या ‘दसरा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धुमाकूळ घातला. अजय देवगणच्या ‘भोला’शी टक्कर घेऊनसुद्धा या चित्रपटाने चांगलीच कमाई केली. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. ३० मार्चला रामनवमीच्या मुहुर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या सहा दिवसांत १०० कोटींची कमाई केली.
नानीच्या ‘दसरा’ने प्रदर्शनाच्या दिवशी १७ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १२ कोटींची कमाई करत या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत जगभरात ५३ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर केवळ सहा दिवसांतच दसरा चित्रपटाने १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणारा ‘दसरा’ची लोक ओटीटी प्रदर्शनाची वाट बघत होते.
आणखी वाचा : २०२४ ची ‘ईद’सुद्धा भाईजानसाठी ठरणार स्पेशल? तब्बल २५ वर्षांनी सलमान खान करणार करण जोहरसह चित्रपट
आता प्रतीक्षा संपली आहे. नानीचा बहुचर्चित ‘दसरा’ हा चित्रपट लवकरच ओटीटीवर झळकणार आहे. ‘दसरा’ येत्या २७ एप्रिलपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. नेटफ्लिक्स इंडिया साऊथच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित होणार नसल्याने बरेच लोक निराश झाले आहेत. शिवाय तो हिंदीत कधी आणि कुठे पाहायला मिळेल याबद्दलही काहीच अपडेट समोर आलेली नाही. ६५ कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६ दिवसात १०० कोटीचा आकडा पार करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता ओटीटीवरही या चित्रपटाला तितकाच जबरदस्त प्रतिसाद मिळतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं असेल.