Dia Mirza Shares Kaafir shooting experience : बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा नुकतीच ‘नादानियां’मध्ये झळकली होती. त्याआधी तिने ‘धक धक’मध्ये काम केलं होतं.. तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या ‘काफिर’ या वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. ही सीरिज आता चित्रपट म्हणून प्रदर्शित होणार आहे.

‘काफिर’मध्ये दियाच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. यामध्ये एका पाकिस्तानी महिलेची कथा दाखवण्यात आली आहे. त्या महिलेची भूमिका दिया मिर्झाने साकारली आहे. चित्रपटात तिच्या पात्राचे नाव कैनाज आहे आणि ती चुकून सीमा ओलांडून भारतात येते, त्यानंतर तिला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. आता दिया मिर्झाने या चित्रपटाच्या शूटिंगबद्दल सांगितलं आहे. यामधील बलात्काराच्या दृश्याच्या शूटिंगचा अनुभव तिने सांगितला.

‘काफिर’मधील दियाच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. पण त्यातील बलात्काराचा सीन शूट करणं खूप अवघड होतं. हा सीन केल्यानंतर दिया थरथर कापत होती.

“मला आठवतंय जेव्हा आम्ही बलात्काराचे सीन शूट केले होते; ते खरंच खूप कठीण होते. आम्ही त्या दृश्याचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर मी थरथर कापत होते. मला धक्का बसला होता. तो सीन पूर्ण केल्यानंतर मला उलट्या झाल्या. ते सीन शूट करतानाची परिस्थिती भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक होती. जेव्हा तुम्ही तुमचे संपूर्ण शरीर ते सीन करण्यासाठी झोकून देता तेव्हा तुम्हाला त्या सत्य परिस्थितीची जाणीव होते,” असं दिया म्हणाली.

पाहा काफिरचा ट्रेलर –

दिया म्हणाली की ‘काफिर’मध्ये कैनाजचे पात्र साकारल्याने तिला एक व्यक्ती म्हणून मदत झाली. या भूमिकेने तिला खऱ्या आयुष्यात आई होण्यापूर्वी मातृत्वाची भावना निर्माण केली. “मला वाटतं की एक कलाकार म्हणून पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही साकारत असलेल्या व्यक्तिरेखेबद्दल सहानुभूती असणे आणि तिला पडद्यावर जिवंत रूप देणे. जेणेकरून तुम्ही ती भूमिका करता तेव्हा तुम्ही कथेशी आणि सर्व गोष्टींशी पूर्णपणे जोडलेले असता. कैनाजच्या भूमिकेने मी खऱ्या आयुष्यात आई होण्यापूर्वीच मला आई बनवलं होतं,” असं दियाने नमूद केलं.

तुम्हाला दिया मिर्झाची ‘काफिर’ ही सीरिज पाहायची असेल तर ती झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. यामध्ये मोहित रैना महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.