दिलजीत दोसांज हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. एक बहुआयामी अभिनेता अशी त्याची ओळख आहे. तो पंजाबी आहे. त्याच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होतं, पण याचबरोबर त्याने आतापर्यंत कधीही त्याची पगडी काढून काम केलेलं नाही, यासाठी त्याचं कौतुक होत असतं. आता पहिल्यांदाच प्रेक्षकांनी त्याला पगडीशिवाय पाहिलं आहे. यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत त्याच्या या निर्णयाबद्दल असहमती दर्शवत आहेत.
दिलजीतच्या आगामी ‘चमकिला’ या चित्रपटाचा टीझर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. भारतीय गायक आणि संगीतकार अमर सिंह चमकिला यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. ते पंजाबचे सर्वाधिक विक्रमी रेकॉर्डची विक्री करणारे कलाकार होते. ८ मार्च १९८८ रोजी त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या चित्रपटामध्ये दिलजीत अमर सिंह चमकिला यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी त्याने त्याच्या डोक्यावरील पगडी पहिल्यांदाच उतरवली.
आणखी वाचा : दिलजीत दोसांझच्या आगामी ‘जोगी’ चित्रपटाचा टीझर आऊट, येणार ‘या’ दिवशी भेटीला
पण डोक्यावरील पगडी उतरवून काम करण्याचा त्याचा हा निर्णय त्याच्या काहींना आवडला नाही. या चित्रपटाचा हा टीझर रिलीज होताच त्याच्या चाहत्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “दिल टूट गया पाजी… पगडीशिवाय हे चांगलं दिसत नाहीये.” तर दुसरा म्हणाला, “तुम्हाला पाहून काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटत आहे.” तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “तू असं करायला नको होतंस.” नेटकर्यांनी दिलजीतच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली असताच दुसरीकडे दिलजीतच्या चाहत्यांनी त्याची बाजू घेत कमेंट्स केल्या. अनेकांनी लिहिलं, “हा पूर्णपणे दिलजीतचा निर्णय आहे. शेवटी तो एक अभिनेता आहे आणि तो त्याचं काम करत आहे.”
दरम्यान, दिलजीतचा हा आगामी चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री परिणीती चोप्रा प्रमुख भूमिकेत दिसेल.