भारतीय गायक आणि संगीतकार अमर सिंह चमकिला हे एके काळचे पंजाबी संगीतविश्वातील एक मोठे नाव होते. ते पंजाबचे सर्वाधिक विक्रमी रेकॉर्डची विक्री करणारे कलाकार होते. ८ मार्च १९८८ रोजी त्याची हत्या झाली. ते आणि त्यांची पत्नी अमरजोत कौर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. आता लवकरच ही गोष्ट तुम्हाला चित्रपटाच्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे.
गेल्यावर्षी ‘अमर सिंह चमकिला’ या चित्रपटाचा टीझर सादर करण्यात आला होता, तेव्हापासूनच या चित्रपटाची लोक आतुरतेने वाट बघत होते. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नेटफ्लिक्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून शेअर केली आहे. एक खास व्हिडीओ शेअर करत चित्रपटाचे पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. “माहोल बन जाता था जब वो छेडता था साज, कुछ ऐसा ही था चमकीला का अंदाज.” असं कॅप्शन देत याची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
आणखी वाचा : “मीसुद्धा सुशांतसारखं पाऊल उचलणार होतो…”, आयुष्यातील ‘त्या’ खडतर काळाबद्दल विवेक ओबेरॉयचा मोठा खुलासा
सर्वप्रथम हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार होता पण नंतर काही कारणास्तव हा चित्रपट ओटीटीसाठीच बनवायचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. हा चित्रपट १२ एप्रिलपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित आणि ए. आर. रहमान यांचं संगीत असलेल्या या चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
अमर सिंह चमकिला हे पंजाबच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम लाइव्ह स्टेज गायकांपैकी एक मानले जातात. पंजाबच्या छोट्याछोट्या खेड्यातील प्रेक्षकांमध्ये ते खूप लोकप्रिय होते. ज्या पंजाबी खेडेगावात ते लहानाचे मोठे झाले. त्या गावातील जीवनाचा, तिथल्या परंपरेचा, तिथल्या संगीताचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव होता. त्यांनी विवाहबाह्य संबंध, वृद्धत्व, मद्यपान, अमली पदार्थांचा वापर आणि पंजाबी पुरुषांचा रागीट स्वभाव यावर बरीच गाणी लिहिली. यामुळे बऱ्याचदा अमर सिंह चमकिला वादाच्या भोवऱ्यातही अडकले.
८ मार्च १९८८ चा दिवस अमर सिंह चमकिलाचे चाहते कधीही विसरू शकत नाहीत. अमर सिंह आपली पत्नी अमरजोतबरोबर एका कार्यक्रमासाठी पंजाबमधील मेहसमपूर येथे येणार होते. पहाटे दोनच्या सुमारास ते त्यांच्या कारमधून निघाले, मात्र कारमधून उतरताच दोघांवर गोळीबार करण्यात आला आणि तिथेच त्या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेत इतर लोकही जखमी झाले. या प्रकरणात आजवर कुणालाच अटक झालेली नाही. ही घटना शीख दहशतवाद्यांनी घडवून आणल्याचं सांगण्यात येतं पण अद्याप अमर सिंह चमकिला यांची हत्या का झाली? याचं उत्तर मिळालेलं नाही.