गेले अनेक दिवस अभिनेत्री सुष्मिता सेनच्या ‘ताली’ या वेब सीरिजची सर्वत्र खूप चर्चा होती. अखेर ही वेब सीरिज १५ ऑगस्टला प्रदर्शित झाली आहे. ताली ही वेब सिरीज तृतीयपंथीयांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या, त्यांच्या हक्कांसाठी उभ्या राहणाऱ्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे.
या वेब सिरीजला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिरीजचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं आहे. तर यामध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन हिने प्रमुख भूमिका साकारली आहे. आता या सिरीजच्या निमित्ताने सुष्मिताबरोबर काम करण्याचा अनुभव रवी जाधव यांनी शेअर केला आहे. याचबरोबर गौरी सावंत आणि सुष्मिता सेन यांच्यात त्यांना के साम्य वाटतं हेही त्यांनी सांगितलं.
‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मला सुष्मिता सेनसारख्या मोठ्या अभिनेत्रीबरोबर काम करण्याचं सुरुवातीला दडपण आलं होतं. हळूहळू त्यांच्याबरोबर होणाऱ्या संवादातून त्यांचं व्यक्तिमत्व उलगडत गेलं. तेव्हा मला जाणवलं की सुष्मिता सेन आणि गौरी सावंत यांच्यात खूप साम्य आहे. दोघींनाही आई होण्याची इच्छा होती आणि म्हणून त्यांनी मूल दत्तक घेतलं. प्रत्येक व्यक्तीची त्या दोघीही खूप काळजी घेतात. सगळ्यांची प्रेमाने विचारपूस करतात. ‘ताली’चं शूटिंग सुरू झाल्यानंतर सुष्मिता सेन जास्त खुलत गेल्या.”
दरम्यान ‘ताली’ या वेब सिरीजचं सर्वत्र कौतुक होत आहे. या सिरीजमध्ये सुष्मिता सेनबरोबरच ऐश्वर्या नारकर, हेमांगी कवी, कृतिका देव, सुव्रत जोशी या मराठी कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.