लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म Disney + Hotstar ची सेवा ठप्प झाली आहे. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना सुरू असतानाच युजर्सना ही अडचण आली आहे. हे प्लॅटफॉर्म डाउन झालं असल्याच्या तक्रारी मोठ्या संख्येने युजर्स करत आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे, त्याचं ओटीटी प्रसारण Disney+ Hotstar वर होत आहे. पण अचानक युजर्सना लॉग इन करण्यात अडचणी येत आहेत.
सामना सुरू असताना अचानक हॉटस्टार डाऊन झाल्याची तक्रार युजर्स करत आहेत. डाऊन डिटेक्टरवरही मोठ्या प्रमाणात लोक याबाबत तक्रारी करत आहेत. युजर्सच्या मते ते मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीवर Disney+ Hotstar अॅक्सॅस करू शकत नाहीत.
गेल्या १ तासापासून या ओटीटी प्लॅटफॉर्मची सेवा बंद आहे. सेवा बंद झाल्यानंतर कंपनीने अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. केवळ OTT प्लॅटफॉर्मच नाही तर कंपनीची वेबसाइट hotstar.com देखील डाऊन आहे.
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही समस्या भारतातील प्रमुख शहरांतील युजर्सना येत आहे. डाऊन डिटेक्टरच्या मते, सर्वाधिक प्रभावित युजर्स दिल्ली, लखनऊ, नागपूर, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरू येथील आहेत. देशातील सर्व मोठ्या शहरांमध्ये युजर्सना लॉग इन करण्यात अडचणी येत आहेत.
दरम्यान, मॅचच्या दिवशी अॅप डाऊन झाल्याने नेटकरी संतापले आहेत. अनेक क्रिकेटप्रेमी ट्वीट करून महत्त्वाची मॅच सुरू असतानाच हॉटस्टार बंद पडल्याने संताप व्यक्त करत आहेत. हॉटस्टार डाऊन झाल्याने ट्वीटरवर #HotstarDown हॅशटॅग ट्रेंड होत आहे.