बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता एल्विश यादव गेल्या काही दिवसांपासून सापाची तस्करी केल्याप्रकरणी चर्चेत आहे. आता याप्रकरणी ईडीने त्याला नोटीस पाठवली असून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
एल्विश यादव सध्या भारताबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एल्विश यादवला ८ जुलैला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र तो परदेश दौऱ्यावर असल्याने आपण सध्या चौकशीसाठी येऊ शकत नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे त्याला २३ जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याबरोबरच ८ जुलैला एल्विश यादवचा जवळचा मित्र आणि हरियाणातील गायक राहुल यादव ऊर्फ फाजिलपुरियाची ईडीच्या लखनऊ ऑफिसमध्ये जवळजवळ सात तास चौकशी करण्यात आली आहे. त्याने त्याच्या एका लोकप्रिय झालेल्या गाण्यात सापाचा वापर केला होता. एल्विशचे इतर साथीदार ईश्वर यादव आणि विनय यादव यांचीदेखील याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे.
याप्रकरणी एल्विश यादव आणि इतर सहा लोकांविरुद्ध एफआयआरची नोंद झाली होती. त्यानंतर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत १२०० पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली होती. यामध्ये असे म्हटले होते की, सापांची तस्करी करून पार्टीमध्ये विषाचा वापर केला गेला आहे.
रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याप्रकरणी रविवारी १७ मार्च रोजी एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी एल्विशला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. एल्विशनं रेव्ह पार्ट्यांमध्ये साप आणि सापाच्या विषाचा पुरवठा केल्याची कबुली दिल्याचं म्हटलं जात होतं. पण, नंतर एल्विशला जामीन मंजूर झाला होता.
हेही वाचा : किरण मानेंची पोस्ट, “संतांनी टाईमपास म्हणून वारी सुरु केली नव्हती, खतरनाक विद्रोह…”
नोएडा पोलिस आणि वन विभागाच्या पथकाने नोव्हेंबर महिन्यात काही गारुड्यांना अटक केली होती. ते एल्विश यादवला सापाचे विष पुरवत असत, अशी माहिती त्यांनी चौकशीदरम्यान दिली होती. त्यानंतर एल्विश यादव आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. एल्विश यादवने हे आरोप खोटे असून आपण निर्दोष आहोत, आपल्याला या प्रकरणात फसवले जात असल्याचे म्हणत स्वत:ची बाजू मांडली होती. बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वात एल्विश यादवने प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांच्या मनात स्वतःची वेगळी जागा निर्माण केली होती. याबरोबरच त्याने या पर्वाचे विजेतेपद आपल्या नावावर केले होते. आता ईडीच्या चौकशीत काय निष्पन्न होणार आणि एल्विश व त्याच्या साथीदारांवर आरोप सिद्ध होणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.