बिग बॉस ओटीटी-२ चा विजेता एल्विश यादव सध्या चर्चेत आहे. रेव्ह पार्टीत सापाच्या विषाचा पुरवठा केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रविवारी (१७ मार्च) पोलिसांनी एल्विशला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
एल्विशनं सापांचं विष पुरविल्याची कबुली दिल्याचं वृत्त ‘एनडीटीव्ही’नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. एल्विशनं रेव्ह पार्ट्यांमध्ये साप आणि सापाच्या विषाची व्यवस्था केल्याचं कबूल केलं आहे, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं. तथापि, नुकत्याच दिलेल्या ‘आज तक’च्या मुलाखतीत त्याच्या पालकांनी स्पष्ट केलं, “आम्ही त्याला काल रात्रीच भेटलो आणि त्यानं अशी कोणतीच कबुली दिली नसल्याचं सांगितलं.”
त्याशिवाय एल्विश त्याच्या व्हिडीओजमध्ये मर्सिडीज, पोर्शसारख्या स्पोर्ट्स कार आणि आलिशान मालमत्ता दाखवायचा. परंतु, त्याच्याकडे अशी कोणतीच कार आणि मालमत्ता नसल्याचं त्याच्या पालकांनी सांगितलं. एल्विशच्या पालकांनी खुलासा केला की, एल्विशकडे फक्त टोयोटा फॉर्च्युनर आणि एक वॅगन-आर आहे आणि त्या दोन्ही गाड्या कर्ज काढून घेतलेल्या आहेत. त्याच्या वडिलांनी सांगितलं की, एल्विश व्हिडीओ शूटसाठी मित्रांकडून कार घेतो आणि नंतर त्या परत करतो.
हेही वाचा… बाळाच्या जन्मानंतर विक्रांत मेस्सीचं बदललं आयुष्य; अभिनेता म्हणाला,”माझ्या बाळाचे…”
एल्विशच्या व्लॉग्समध्ये दाखविल्याप्रमाणे, दुबईमध्ये आठ कोटींचं घर, जमीन किंवा फ्लॅट असल्याचं त्याच्या पालकांनी नाकारलं. एल्विशची कमाई मुख्यतः त्याच्या यूट्यूब चॅनेल आणि ऑनलाइन जॅकेटविक्रीतून होते, असंही त्याचे वडील म्हणाले.
नेमके प्रकरण काय?
नोव्हेंबर महिन्यात नोएडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने साप पकडणाऱ्या पाच गारुड्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून पाच कोब्रा आणि काही विष जप्त करण्यात आलं होतं. या आरोपींनी सांगितलं की, ते एल्विश यादवला सापाचं विष पुरवायचे. त्यानंतर एल्विश यादवसह सहा जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. एल्विशनं आता गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे.