युट्यूबर व ‘बिग बॉस ओटीटी २’ चा विजेता एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तो रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करत असून त्यात सापाचे विष आणि परदेशी तरुणी पुरवत असल्याचा आरोप त्याच्यावर झाला आहे. नोएडातील सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात एल्विशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात इतर पाच जणांना अटकही झाली आहे. यासंदर्भात एल्विश यादवची प्रतिक्रिया समोर आली आहे.
एल्विश यादवने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये व्हिडीओ शेअर केला आहे. म्हणाला, “खरं तर मला गंभीर वातावरणात राहायला आवडत नाही, गंभीर विषयांवर बोलायलाही मला आवडत नाही. पण माझ्याविरोधात जेव्हा पूर्णपणे खोट्या बातम्या पसरतात ना, तेव्हा बोलावं लागतं. माझा या गोष्टींशी कोणताच संबंध नाही. तुम्ही लोक रोज माझे व्लॉग्स बघता. मी रोज नवनवीन ठिकाणी असतो. कधी लंडनमध्ये असतो तर कधी मुंबईत शुटिंग करत असतो. कामामुळे घरी वेळ देता येत नाहीये आणि ही अशी सगळी काम करणार. आरोपही कसे लावलेत तर म्हणे विषारी सापांचे विष पुरवतो. हेच काम उरलंय मला आयुष्यात. सापांचं विष लोकांना विकू, त्याचा नशा करू याच गोष्टी उरल्यात आता,” अशी प्रतिक्रिया त्याने व्हिडीओत दिली आहे.
दरम्यान, सापांचा व्हिडीओ हा सहा महिने जुना असल्याचंही एल्विशने सांगितलं आहे. “माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीच सत्य नाही. सगळे खोटे आहेत. मी या प्रकरणात उत्तर प्रदेशात पोलिसांना पूर्ण मदत करेन. मी प्रशासन, यूपी पोलीस व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करतोय की या प्रकरणात माझा थोडाही सहभाग आढळला तर मी पूर्ण जबाबदारी घेईन. पण जोपर्यंत कुठलेही पुरावे नाहीत, तोपर्यंत माझं नाव बदनाम करू नका,” असं तो म्हणाला.