एका अभिनेत्याची पत्नी रोज शिकायला दुसऱ्या देशात जायची, असं सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसेल का? कदाचित नाही. पण हे खरं आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मधील एका अभिनेत्याने त्याच्या पत्नीबद्दल हा खुलासा केला आहे. एवढंच नाही तर त्याच्या पत्नीजवळ १२-१३ पासपोर्ट्स आहेत, असंही त्याने सांगितलं.
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ फेम अभिनेत्री अर्चना पूरन सिंग तिच्या युट्यूबवर व्लॉग शेअर करत असते. आता अर्चना व तिच्या कुटुंबाने किकू शारदा आणि त्याची पत्नी प्रियांका यांच्याबरोबर एक व्लॉग बनवला. यादरम्यान किकू शारदाने सांगितलं की त्याची पत्नी दररोज शिकायला सिंगापूरला जात असे. हे ऐकून अर्चनाला धक्का बसला.
किकू शारदा पत्नीबद्दल काय म्हणाला?
व्हिडीओमध्ये परमीतने प्रियांकाला तिच्या शिक्षणाबद्दल विचारलं. तो प्रवास खूप मोठा होता, असं प्रियांकाने सांगितलं. किकू म्हणाला, “जेव्हा आमचं नवीन लग्न झालं होतं, तेव्हा मी तिला माझा पासपोर्ट तिला दाखवला आणि त्यावरील स्टॅम्प दाखवून शो ऑफ करत करत होतो. तसेच तिला तिचा पासपोर्ट माझ्याकडेच राहू दे, असं सांगितलं. मग तिने ४-५ पासपोर्टचे बंडल काढून टेबलावर ठेवले. मी तिला विचारलं की तिच्याकडे इतके पासपोर्ट का आहेत? मी माझा एक पासपोर्ट दाखवत होतो आणि इथे तिच्याकडे ५ पासपोर्ट आहेत. मग तिने मला सांगितलं की तिचे आणखी ७-८ पासपोर्ट आहेत जे तिने तिच्या घरी ठेवले आहेत. त्यामुळे तिच्याकडे एकूण १२-१३ पासपोर्ट आहेत. मग मी तिला विचारलं की तिने असं काय केलंय की तिला इतक्या पासपोर्टची गरज भासली. त्यावेळी मला कळलं की ती मलेशियामध्ये राहते कारण तिचे वडील तिथे काम करत होते आणि तिथे फार चांगल्या शाळा नसल्यामुळे तिला दररोज शिकायला सिंगापूरला जावं लागायचं.”
प्रियांका पुढे म्हणाली, “मी रोज ये-जा करायचे आणि ३० मिनिटांत शाळेत पोहोचायचे.” हे ऐकून अर्चनाला आश्चर्याचा धक्का बसला. आपण असं काहीतरी पहिल्यांदाच ऐकलंय, असं अर्चना म्हणाली. तर “हे ऐकून मलाही धक्का बसला होता,” असं किकूने सांगितलं.
दरम्यान, कॉमेडियन किकू शारदा जुनैद खान-खुशी कपूरच्या ‘लवयापा’ या चित्रपटात मोठ्या पडद्यावर झळकला होता. तसेच किकू ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये अर्चना पूरण सिंग, कृष्णा अभिषेक, सुनील ग्रोव्हरबरोबर प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतो. अर्चनाबद्दल बोलायचं झाल्यास ती कपिलच्या शो व्यतिरिक्त, शेवटची ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’मध्ये दिसली होती. ती राजकुमार रावची निर्मिती असलेल्या ‘टोस्टर’साठी शूटिंग करत होती, पण या शूटिंगदरम्यान अर्चना काही आठवड्यांपूर्वी चित्रपटाच्या सेटवर जखमी झाली आणि तेव्हापासून ती ब्रेकवर आहे. दुसरीकडे, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच नेटफ्लिक्सवरील कपिल शर्मा व इतर मंडळी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतील.