Recent Flop Films : बॉलीवूड असो वा दाक्षिणात्य, दरवर्षी मोठ्या प्रमाणात सिनेमे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतात. पण, रिलीज होणारे सर्वच सिनेमे चालतील असं नाही. काही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरतात तर काही मात्र कधी आले आणि कधी थिएटर्समधून गायब झाले तेही कळत नाही. या वर्षातही बरेच चित्रपट रिलीज झाले, पण ‘छावा’ एकमेव २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
इतर कोणत्या बॉलीवूड चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. तीन महिन्यांतील परिस्थिती पाहता २०२५ हे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीसाठी कसे ठरेल, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले पण ते लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. ते बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या फ्लॉप झाले, मात्र रंजक गोष्ट अशी आहे की यापैकी काही चित्रपटांनी कमाईच्या बाबतीत चांगली कामगिरी केली नसली तरीही, जेव्हा ते ओटीटीवर प्रदर्शित झाले तेव्हा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि ते संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंग राहिले. अशाच चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात.
आझाद
अजय देवगणने दिग्दर्शित केलेला ‘आझाद’ चित्रपट १७ जानेवारी २०२५ रोजी रिलीज करण्यात आला होता. यातून अजयचा भाचा अमन देवगण व रवीना टंडनची मुलगी राशा थडानीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. ८० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने फक्त ६.९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला होता, पण अमन व राशाची केमिस्ट्री लोकांना आवडली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आणि तो टॉप १० ट्रेडिंग सिनेमांच्या यादीत होता.
स्काय फोर्स
अक्षय कुमारच्या करिअरला मागील काही काळापासून उतरती कळा लागली आहे. त्याचे मागील पाच वर्षात प्रदर्शित झालेले चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. त्याचा व वीर पहारियाचा ‘स्काय फोर्स’ चित्रपट २४ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे बजेट १६० कोटी होते, पण त्याने बॉक्स ऑफिसवर फक्त १०० कोटी कलेक्शन केले होते. हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज झाल्यावर मात्र ओटीटीवर ट्रेंड करतोय.
इमर्जन्सी
कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ रिलीज डेट पुढे सरकत सरकत अखेर १७ जानेवारी २०२५ ला रिलीज झाला. वादात अडकलेल्या या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणीही झाली होती. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीवर आधारित हा सिनेमा होता. ६० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाने फक्त १४.३ कोटी रुपयांची कमाई केली. नंतर तो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. तिथे हा चित्रपट ट्रेंड करू लागला. हा चित्रपट पहिल्या क्रमांकावरही ट्रेंड करत होता. सध्या तो टॉप १० पैकी तिसऱ्या क्रमांकावर आहे.
बेबी जॉन
वरुण धवनचा चित्रपट ‘बेबी जॉन’ हा ख्रिसमस २०२४ ला रिलीज झाला होता. यामध्ये वरुणबरोबर किर्ती सुरेश मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपटाकडे थिएटर्समध्ये प्रेक्षकांनी पाठ फिरवली. मात्र, नंतर तो प्राइम व्हिडीओवर रिलीज करण्यात आला. या चित्रटाचं दिग्दर्शन अॅटली कुमारने केलं होतं. हा अॅक्शनपट ओटीटीवरील टॉप १० ट्रेडिंग सिनेमांच्या यादीत होता.