‘द काश्मीर फाइल्स’नंतर ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर इतिहास रचला. १५ ते २० कोटींच्या बजेटमधल्या या चित्रपटाने ३०० कोटींहून अधिक कमाई केली. वादग्रस्त विषय आणि बेधडक मांडणीमुळे हा चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला. केरळमधील हिंदू मुलींचे धर्मांतरण आणि त्यानंतर त्यांची ISIS मध्ये होणारी भरती असा गंभीर विषय असल्याने या चित्रपटावर बरीच टीकाही झाली.
जेवढी टीका या चित्रपटावर झाली तितकाच भरभरून प्रतिसाद प्रेक्षकांकडून या चित्रपटाला मिळाला. चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन, निर्माते विपुल अमृतलाल शाह तसेच यातील मुख्य अभिनेत्री अदा शर्मा यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर एकत्र येऊन यातून गेलेल्या मुलींना जगासमोर आणून विरोध करणाऱ्या लोकांना प्रत्युत्तर दिलं. चित्रपटाची एवढी हवा होऊनसुद्धा हा चित्रपट ओटीटी प्रदर्शनासाठी झटत होता. गेले ८ महीने हा चित्रपट ओटीटी प्रदर्शनापासून लांब होता, पण आता मात्र हा चित्रपट लवकरच ओटीटीवर येणार आहे.
आणखी वाचा : “आम्ही शाळकरी विद्यार्थी…” राज्यसभेत जया बच्चन संतापल्या, उपराष्ट्रपतींकडे व्यक्त केली नाराजी
सर्वसाधारणपणे चार आठवड्यांनी कोणताही चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होतो, पण ‘द केरला स्टोरी’ इतके दिवस ओटीटीवर न आल्याने प्रेक्षक चांगलेच खोळंबले होते. आता मीडिया रीपोर्टमधून या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल नवी माहिती समोर आली आहे. ‘द केरला स्टोरी’ आता ‘झी५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०१६ पासून प्रेक्षकांना ‘झी५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.
अदा शर्मानेही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी शेअर केली आहे, मध्यंतरी हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार अशी चर्चा होती, पण त्यानंतर ही बातमी खोटी ठरली. हा चित्रपट अतिशय संवेदनशील विषयावर बेतलेला असल्याने कोणतेही ओटीटी प्लॅटफॉर्म हा चित्रपट प्रदर्शित करण्यास तयार नसल्याचीही बातमी समोर आली होती. आता मात्र ‘झी५’कडूनही याबाबत अधिकृत घोषणा झालेली असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे.