मिर्झापूर’ या लोकप्रिय वेबसीरिजमधील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. गुन्हेगारी विश्वावर बेतलेल्या या वेबसीरिजचे आतापर्यंत दोन सीझन आले असून आता प्रेक्षक तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेवटचा सीझनने चाहत्यांना कथेच्या मध्यभागी सोडले आणि त्यांना आश्चर्यचकित केले असल्याने या सीरिजच्या तिसऱ्या सीझनसाठी प्रेक्षक फार उत्सुक असल्याचं दिसत आहे.
‘मिर्झापूर’मध्ये आता पुढे काय होणार आहे, हे सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे. कालीन भैय्या हे त्यांच्या मुलाच्या खुनाचा बदला घेणार की गुड्डू भैय्या हाच ‘मिर्झापूर’चा राजा होणार? याविषयी सध्या प्रेक्षक वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. गेले बरेच महीने प्रेक्षक या तिसऱ्या सीझनच्या घोषणेची आतुरतेने वाट बघत होते. अशातच आता प्राइम व्हिडीओने याबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.
नुकतंच प्राइम व्हिडीओने एक खास व्हिडीओ शेअर करत २०२४ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या तब्बल ७० वेगवेगळे चित्रपट आणि वेब सीरिज यांची एक छोटीशी झलक दाखवली. याच व्हिडीओमध्ये ‘मिर्झापूर’च्या तिसऱ्या सीझनचीही झलक लोकांना पाहायला मिळाली. “भूल तो नहीं गये हमें” असा प्रश विचारत पंकज त्रिपाठी हे कालीन भैय्या यांच्या भूमिकेत पाहायला मिळाले. तर सीरिजमधील इतरही महत्त्वाच्या पात्रांची एक झलक यात पाहायला मिळाली. अली फजल, श्वेता त्रिपाठी, रासिका दुग्गल, विजय वर्मा, ईशा तलवार यांच्या पात्रांची झलकही या व्हिडीओत काही सेकंदासाठी बघायला मिळाली.
आणखी वाचा : ‘शार्क टँक इंडिया’फेम ‘झोमॅटो’चे संस्थापक दीपींदर गोयलवर का भडकले नेटकरी? म्हणाले, “हा भेदभाव…”
याबरोबरच या व्हिडीओमध्ये ‘पाताल लोक’, ‘बंदिश बॅन्डीट’ या आगामी सीरिजच्या पुढील सीझनचीही झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. २०१८ मध्ये ‘मिर्झापूर’चा पहिला सीझन प्रदर्शित झाला जो प्रेक्षकांना प्रचंड आवडला, नंतर २०२० मध्ये आलेल्या याच्या दुसऱ्या सीझनलाही प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनचे पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू असून त्याचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे या वेबसीरिजचे निर्माते आणि प्राइम व्हिडिओ लवकरच या तिसऱ्या सीझनच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय आता ही झलक पाहून तर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
या वेबसीरिजचे लाखो चाहते जरी असले तरी या तिसऱ्या सीजनवर बंदी घालण्याची एक याचिका मध्यंतरी न्यायालयात दाखल करण्यात आली होती. परंतु तिसऱ्या सीझनला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आलेली दृश्य, भाषा यामुळे याच्या तिसऱ्या सीझनवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. मिर्झापूर येथील एका रहिवाश्यानेच ही याचिका दाखल केल्याचं स्पष्ट झालं होतं. पंकज त्रिपाठी, अली फझल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल यांसारख्या कलाकारांनी या वेबसीरिजमध्ये उत्तम काम केलं आहे.