Govinda Krushna Abhishek Reunite : कॉमेडियन कपिल शर्मा याचा लोकप्रिय शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मागील एपिसोडमध्ये सिन्हा कुटुंबीयांनी या शोमध्ये हजेरी लावली होती. सोनाक्षी, शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले, तर त्यांच्याबरोबर सिन्हा कुटुंबाचा जावई जहीर इकबाल यानेही हजेरी लावली होती. आता या शोचा आगामी एपिसोड खूप चर्चेत आहे, कारण १९९० च्या दशकातील तीन दिग्गज कलाकार गोविंदा, शक्ती कपूर आणि चंकी पांडे एका मंचावर येणार आहेत.
या एपिसोडचे काही प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या प्रोमोमध्ये अनेक वर्षांनंतर गोविंदा (Govinda) आणि कृष्णा अभिषेक (Krushna Abhsihek) एका मंचावर एकत्र दिसत आहेत. या भागात गोविंदा आणि कृष्णा एकत्र आल्याने मामा-भाच्यांमधील जुना वाद संपुष्टात आला असल्याचे अंदाज त्यांचे चाहते बांधत आहेत. या शोमध्ये गोविंदाने कृष्णाला मिठी मारल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे.
प्रोमोमध्ये गोविंदा, शक्ती कपूर यांची मजेशीर शैली पाहायला मिळते. शक्ती कपूरच्या कथित अफेअर्सवर गोविंदा आणि चंकी पांडे त्याची चेष्टा करताना दिसतात. कृष्णा अभिषेक शोमध्ये ‘अली बाबा आणि ४० चोर’ या कथेतील अली बाबाच्या वेशात प्रवेश करतो, तर किकु शारदा जिन बनून येतो.
प्रोमोमध्ये कृष्णा अभिषेक गोविंदाला मिठी मारत म्हणतो, “आपण खूप दिवसांनी भेटलो आहोत, आता मी तुम्हाला जाऊ देणार नाही.” यावर गोविंदा आणि किकु शारदा मजेशीर टिप्पणी करतात. कृष्णा आपल्या शैलीत किकु शारदाची गाढवाबरोबर तुलना करतो, तेव्हा गोविंदा कृष्णाला मिश्कीलपणे म्हणतो, “काळा कुर्ता घातलेला तुही गाढवच आहे.” त्यावर सगळे हसतात आणि कृष्णालाही हसू आवरत नाही.
आठ वर्षांचा वाद संपुष्टात
गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यातील वाद २०१६ मध्ये सुरू झाला होता. कृष्णाने त्याच्या शोमध्ये केलेल्या एका विनोदामुळे गोविंदा नाराज झाला होता. त्यानंतर कृष्णाची पत्नी कश्मीरा शाहच्या एका ट्विटमुळे हा वाद अधिकच चिघळला. त्यावेळी दोघांनी माध्यमांतून एकमेकांवर टीका केली होती, मात्र आता या वादावर पडदा पडल्याचे दिसत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd