‘स्कॅम १९९२’सारखी यशस्वी वेब सीरिज दिल्यानंतर करिश्मा तन्ना या अभिनेत्रीला घेऊन दिग्दर्शक हंसल मेहता एक नवी कोरी वेब सीरिज आपल्यासाठी घेऊन येत आहेत. हंसल यांच्या याच आगामी ‘स्कूप’ या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये स्टार क्राईम रीपोर्टर जागृती पाठकची कथा दाखविण्यात आली आहे, जिच्या आयुष्यात एका ब्रेकिंग न्यूजमुळे भयानक वादळ येतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रेलरची सुरुवातच अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या फोनकॉलपासून होते आणि यानंतर जागृती पाठक हिच्या आयुष्यात एक वेगळंच वळण येतं आणि एका मर्डर मिस्ट्रीमध्ये या कथानकाचं रूपांतर होतं. पत्रकार आणि डॉनमधील संभाषण आणि त्यामुळे त्या रिपोर्टरच्या आयुष्यात निर्माण होणारं वादळ या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. हंसल मेहता यांची ही वेबसीरिज क्राइम रोपोर्टर जिग्ना वोराच्या ‘बिहाइंड बार्स इं भायखळा; माय डेज इन प्रीजन’ या पुस्तकावर बेतलेली असल्याचं म्हंटलं जात आहे.

आणखी वाचा : मर्डर मिस्ट्री, छोटा राजन अन् क्राइम रिपोर्टरच्या आयुष्यातील वादळ; हंसल मेहतांच्या ‘स्कूप’ वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

कोण आहे जिग्ना वोरा?

या केसमध्ये जिग्ना वोराला ६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. जिग्ना वोरा ‘एशियन एज’ची पत्रकार होती. मिड-डे रिपोर्टर ज्योतिर्मय डे यांच्या हत्येतील दोन प्रमुख संशयितांपैकी ती एक होती. ज्योतिर्मय डे यांची ११ जून २०११ रोजी पवईतील हिरानंदानी येथे अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती.

अंडरवर्ल्ड गँगस्टर छोटा राजनशी संबंधित सात जणांचा या कटात सहभाग असल्याचं स्पष्ट झालं होता. प्राथमिक तपासानंतर मुंबई पोलिसांनी राजन आणि जिग्ना वोरा यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. २०१६ मध्ये ही केस सीबीआयकडे सोपवण्यात आली. मुंबई पोलिसांनी २५ नोव्हेंबर २०११ रोजी जिग्ना वोराला चौकशीच्या संदर्भात ताब्यात घेतले. त्यावेळी ती एशियन एज वृत्तपत्राच्या मुंबई ब्युरोच्या डेप्युटी चीफ होती आणि ३७ वर्षांची होती. तिच्यावर ज्योतिर्मय डे यांच्याविषयी महत्त्वाची माहिती छोटा राजनला दिल्याचा आरोप लावण्यात आला, यात त्यांच्या घराचा पत्ता आणि दुचाकीचा लायसन्स प्लेट नंबर हे पुरावेदेखील सापडले होते.

फेब्रुवारी २०१२ मध्ये, मुंबई पोलिसांनी जिग्ना वोरा विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) यासह इतर अनेक गुन्हेगारी कलमांतर्गत आरोपपत्र दाखल केले गेले. त्यावेळच्या अहवालात असे सुचवले होते की तपासकर्त्यांना जिग्नाविरुद्ध ‘परिस्थितीजन्य पुरावे’ सापडले ज्यात जिग्नाने गँगस्टर छोटा राजनला केलेले तीन फोन कॉल्स समाविष्ट होते. त्यानंतर जिग्नाने एका मुलाखतीसाठी राजनला फोन केल्याचंही स्पष्ट झालं.

छोटा राजनच्या स्टेटमेंटमुळे अडचण :

छोटा राजनच्या म्हणण्यानुसार, जिग्ना वोराने त्यांच्या ‘व्यावसायिक शत्रुत्वामुळे’ ज्योतिर्मय डे यांना मारण्यासाठी त्याला प्रवृत्त केले असल्याचं समोर आलं. ‘मिड डे’चे तत्कालीन कार्यकारी संपादक सचिन कलबाग यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत छोटा राजनच्या वक्तव्याचे खंडन केले होते. त्यांनी दावा केला की जिग्ना वोरा ‘प्रतिस्पर्धे’च्या बाबतीत ज्योतिर्मय डे यांच्यापेक्षा खूपच लहान होती.

आणखी वाचा : १४ वर्षांपूर्वी बलात्कार केसप्रकरणी दोषी ठरलेला अभिनेता शायनी अहुजा सध्या आहे कुठे? करतोय ‘हे’ काम

जिग्नाला २७ जुलै २०१२ रोजी जामिनावर बाहेर सोडण्यात आलं. ‘पीटीआय’च्या वृत्तानुसार तीची मुलगी एकटीच असल्याने तिला जामीन मिळाला होता. त्यानंतर जिग्नाने पुस्तक लिहिलं जे २०१९ मध्ये प्रकाशित झालं. या पुस्तकात तिने तुरुंगातील तिचा अनुभव आणि या केससंदर्भातील सविस्तर माहितीदेखील दिली आहे. यावरच बेतलेली ‘स्कूप’ ही वेब सीरिज २ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये करिश्मा तन्नासह मोहम्मद जीशान अय्यूब, हरमन बावेजा, प्रोसेनजीत चटर्जीसारखे नावाजलेले कलाकारही प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hansal mehta scoop trailer series based on book by crime reporter jigna vora avn
Show comments