२०२० सालातील ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘स्कॅम १९९२’ या हिंदी वेबसीरिजने देशात सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. शेअर बाजारात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यावर ही बेब सिरिज आधारलेली होती. दरम्यान, १९९२ साली झालेल्या घोटाळ्यापेक्षा कित्येक मोठ्या आणि संपूर्ण भारताला हादरवून सोडणाऱ्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यावर ‘स्कॅम २००३’ नावाची नवी वेबसीरिज गेल्या महिन्यात प्रदर्शित झाली.
सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या सीरिजचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आता या सीरिजच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच याच्या दुसऱ्या भागाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. तेलगीने बारबालेवर कोट्यावधी रुपये उधळण्याच्या वळणावर याचा पहिला भाग संपला होता. आता तिथून पुढे ही कथा सरकणार आहे.
आणखी वाचा : “माझ्या बायकोला, मुलांना…” असं म्हणत अखेर राज कुंद्राने मीडियासमोर उतरवला मास्क
हा स्टॅम्प पेपर घोटाळा नेमका कसा वाढला, यामध्ये नेमके कोणते राजकारणी सहभागी होते, नेमका किती कोटींचा हा घोटाळा होता, तेलगी पोलिसांच्या हाती कसा लागला व याचा शेवट कसा झाला अशा सगळ्या गोष्टी या दुसऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागातही दमदार संवाद आणि थरारक नाट्य पाहायला मिळणार आहे.
स्टॅम्प पेपर छापण्यासाठी लागणारी यंत्रे, ही यंत्रे विकत घेण्यासाठी तेलगीने बँका, विमा कंपन्या आणि इतर अनेकांची कशाप्रकारे फसवणूक केली हे आपण पहिल्या भागात पाहिलं होतं. जवळपास ३० हजार कोटींच्या घोटाळ्याची ही गोष्ट आता शेवटाकडे येणार आहे.
या वेब सीरिजमध्ये गगन देव रियार, सना अमीन शेख, भावना बलसावेर, भरत जाधव, जे.डी. चक्रवर्ती, भरत दाभोळकर, शशांक केतकर, तलत अजीज, निखिल रत्नपारखी, विवेक मिश्रा, हिता चंद्रशेखर, अजय जाधव, दिनेश लाल यादव यांच्या भूमिका आहेत. ही मालिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता या सीरिजचे शो रनर असून तुषार हिरानंदानी यांनी ती दिग्दर्शित केली आहे.