संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी : द डायमंड बाजार’ या सीरिजची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या मालिकेत अभिनेता इंद्रेश मलिकने ‘उस्ताद’ ही भूमिका साकारली आहे. ‘हीरामंडी’चं शूटिंग चालू असतानाचा एक खास प्रसंग अभिनेत्याने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंद्रेश मलिकने याआधी संजय लीला भन्साळींच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटात काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल सांगताना इंद्रेश टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “या सीरिजसाठी श्रुती महाजनने माझ्याकडे विचारणा केली. तिने मला कॉल केला होता. ही भूमिका नेमकी कशी आहे हे तिने मला अगदी सविस्तरपणे सांगितलं होतं. कोणतंही काम करण्याआधी दिग्दर्शक काय विचार करतो, तुम्ही काय विचार करता, प्रोडक्शन कशा पद्धतीने गोष्ट हाताळतं या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. माझ्या भूमिकेसंदर्भातील सूचना मला आधीच टीमकडून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे सगळ्या गोष्टी फ्लोमध्ये आणि सोप्या होत गेल्या.”

हेही वाचा : मतदार यादीतून सुयश टिळकचं नाव गायब; खंत व्यक्त करत म्हणाला, “सकाळी ७ वाजता पोहोचलो पण…”

इंद्रेश पुढे म्हणाला, “सरांबरोबर काम करतानाच्या माझ्या अनेक आठवणी आहेत. सीरिजमध्ये एक सीन आहे ज्यात सोनाक्षी मला नथ घालतेय असा सीक्वेन्स आहे. सरांनी मला तो सीन अगदी नीट समजावून सांगितला होता. त्यासाठी मला शूटिंगदरम्यान रडायचं होतं. पण, प्रत्यक्षात सुद्धा तो सीन केल्यावर माझं रडू थांबेना…अगदी सीनमधून एक्झिट घेतल्यावर सुद्धा मला अश्रू अनावर झाले होते. मी ढसाढसा रडलो. मी ५ मिनिटं चालत तसाच पुढे गेलो. सगळेजण माझ्यामागे आले. मला बोलले अरे…सीन कट झालाय तरीही माझं रडणं काही केल्या थांबेना. कारण, नथ परिधान करणं ही खूप मानाची गोष्ट असते. शेवटी सर स्वत: माझ्याजवळ आले. त्यांनी माझ्याकडे घडल्याप्रकाराबद्दल विचारपूस केली.”

हेही वाचा : “होय, त्याने प्रीती झिंटाला डेट केलं होतं,” प्रसिद्ध अभिनेत्रीचा पतीबाबत खुलासा; म्हणाली, “मी त्या दोघांच्या…”

इंद्रेश पुढे म्हणाला, “सरांनी मला जवळ घेत माझं सांत्वन केलं. त्यानंतर आयुष्यात त्यांनी पहिल्यांदा मला ५०० रुपये दिले आणि म्हणाले…’हे तुझ्यासाठी’ त्यांच्याकडून मला बक्षीस मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. एक गुरु आपल्या शिष्याला ५०० रुपयांची नोट देतो…ही गोष्ट माझ्यासाठी कोणत्याही आशीर्वादासमान होती. संजय सर सुद्धा अशाप्रकारे नेहमी कलाकारांचं कौतुक करतात.”

हेही वाचा : “तुझ्याशिवाय एक दिवसही…”, हार्दिक जोशीची अक्षयासाठी रोमँटिक पोस्ट, राणादाने ‘असा’ साजरा केला बायकोचा वाढदिवस

“संजय सरांबरोबर काम करायला मिळणं हे माझं भाग्य आहे. त्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे मी ही भूमिका साकारू शकलो. सर नेहमीच त्यांच्या चित्रपटांमध्ये स्त्रीप्रधान भूमिका लिहितात आणि तशाच त्या पडद्यावर दाखवतात. त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं हीच खूप मोठी गोष्ट आहे” असं इंद्रेशने सांगितलं.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heeramandi indresh malik says sanjay leela bhansali gave him 500 rs as appreciation after nath scene sva 00