संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. ‘हीरामंडी : द डायमंड बझार’ ही वेब सीरिज १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. याचे आठ भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या वेब सीरिजचं कौतुक सध्या इंडस्ट्रीमधले अनेक कलाकार करत आहेत. भारतातूनच नव्हे तर पाकिस्तानातून या वेब सीरिजचं कौतुक होतंय. याबद्दल एका मुलाखतीत संजय लीला भन्साळींनी खुलासा केला आहे.
‘इंडीवायर’ला दिलेल्या मुलाखतीत संजय लीला भन्साळी म्हणाले, “मला पाकिस्तानकडून खूप प्रेम मिळाले. लोक या वेब सीरिजची आतुरतेने वाट पहात होते. जेव्हा संपूर्ण भारत एक होता तेव्हा तो अविभाजित होता, तसेच यांना जोडणारी ही वेब सीरिज एक दुवा आहे जी आपल्या सर्वांना एकत्र आणते. ही लोकं आपली आहेत. ही लोकं दोन्ही देशांची आहेत आणि या वेब सीरिजबद्दल दोन्ही देश खूप प्रेम दाखवत आहेत.”
संजय लीला भन्साळी पुढे म्हणाले, “मला अजूनही असं वाटतं की आपण सर्व एक आहोत, आपण सर्व अनेक गोष्टींमुळे एकमेकांशी जोडलेले आहोत. यावरूनही काही जणांना समस्या निर्माण करायच्या आहेत, त्यांचा विचार सोडून दिला तर मला दोन्ही बाजूंनी प्रेम मिळतंय. प्रेक्षक आणि निर्मात्यामधील देवाण-घेवाणीचा हा एक भाग आहे.”
“माझ्या या वेब सीरिजमध्ये अशी काही पात्र आहेत, जी लोकांना जोडणारी आहेत. म्हणूनच ते या पात्रांबद्दल बोलत आहेत. खूप जणांना ती पात्र आवडली आहेत, खूप जणांना ती पात्र नाही आवडली. जेव्हा त्यांच्याकडून मला प्रेम मिळतं तेव्हा ते स्वीकारायला मला नेहमीच आवडतं आणि जेव्हा ते माझ्या कामाशी जोडले जात नाहीत तेव्हा त्यांनी केलेली टीकाही मला चालते.” असंही संजय लीला भन्साळींनी नमूद केलं.
हेही वाचा… रणबीर कपूरच्या लोकप्रिय चित्रपटातून गोविंदाला काढून टाकलं होतं; अभिनेता झाला होता नाराज
दरम्यान, ‘हीरामंडी : द डायमंड बझार’ ही वेब सीरिज ब्रिटीश राजवटीविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान लाहोरमधील हीरामंडीच्या रेड-लाइट जिल्ह्यातील तवायफांच्या (वेश्यांच्या) जीवनावर आधारित आहे. या वेब सीरिजमध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख, शर्मिन सेगल मेहता, फरदीन खान आदी कलाकार आहेत. या वेब सीरिजचा पहिला सीझन १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.