Fussclass Dabhade on OTT: हेमंत ढोमे दिग्दर्शित बहुप्रतीक्षित चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. दाभाडे कुटुंबाची इरसाल गोष्ट प्रेक्षकांना भावल्याचं दिसून आलं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत होते. माधुरी दीक्षितसह अनेकांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. होय. चित्रपट ओटीटीवर आला आहे, त्यामुळे तुम्ही तो थिएटरमध्ये पाहिला नसेल तर घरी पाहू शकता.

हेमंत ढोमेचा चित्रपट म्हटला की त्यात धमाल ही असतेच. कौटुंबिक विषय अतिशय हलक्याफुलक्या, मजेदार आणि तितक्याच प्रभावीपणे मांडण्यात त्याचा हातखंडा आहे. हा चित्रपटही त्यापैकीच एक आहे. ‘फसक्लास दाभाडे’च्या घोषणेपासून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली होती. दाभाडे कुटुंबातील सदस्यांची आंबट गोड केमिस्ट्री, तायडी, सोनू आणि पप्पू यांच्यातील मजेदार भांडणांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. विनोदासह हृदयस्पर्शी भावनांचा संगम असलेली दाभाडे कुटुंबाची कहाणी तुम्हाला आता ओटीटीवर पाहता येणार आहे.

कुठे पाहता येणार फसक्लास दाभाडे?

तुम्हाला ‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल. २४ जानेवारीला सिनेमागृहांमध्ये रिलीज झालेला हा चित्रपट एका महिन्याच्या आत ओटीटीवर आला आहे. पण तो पाहण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील. ‘फसक्लास दाभाडे’ रेंटवर प्राईम व्हिडीओवर उपलब्ध आहे. तो मोफत पाहण्यासाठी तुम्हाला अजून जवळपास १२ दिवस वाट पाहावी लागणार आहे.

दाभाडे कुटुंबातील लग्नकार्य, नात्यात आलेला दुरावा, गैरसमज, सामाजिक विचारसरणी, रूढी परंपरा अशा अनेक गोष्टींवर या चित्रपटात अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने भाष्य करण्यात आले आहे. खदखदून हसवतानाच डोळ्यांची किनार पाणवणारा हा चित्रपट आता ओटीटीवर आला आहे.

फसक्लास दाभाडे’मध्ये कलाकारांची मांदियाळी

‘फसक्लास दाभाडे’मध्ये क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे, तृप्ती शेडगे, मिताली मयेकरसह अनेक कलाकार आहेत. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे.

Story img Loader