हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे'(Fussclass Dabhade) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर व अमेय वाघ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. भावंडांवर आधारित या चित्रपटाची प्रेक्षकांना भुरळ पडल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता फसक्लास दाभाडे अॅमझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आता या सगळ्यात हेमंत ढोमेच्या सोशल मीडियावरील पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.
हेमंत ढोमेने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचे श्वान टीव्हीसमोर उड्या मारताना दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला, माझ्या आई-बाबांच्या कंपनीचा चौथा सिनेमा आणि माझा पहिला सिनेमा, असे लिहिलेले दिसत आहे. टीव्हीवर ‘फसक्लास दाभाडे’मधील काही क्षण पाहायला मिळत आहेत. तेथे हेमंत व क्षिती यांचे श्वानदेखील आहेत. ते पाहताना काही वेळा हे श्वान उड्या मारतानादेखील पाहायला मिळते. तसेच क्षितीने त्याला उचलून घेतल्याचेदेखील दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करीत हेमंत ढोमेने लिहिले, “सिनेमाच्या मेन हीरोला त्याचा पहिला सिनेमा काही नियमांमुळे चित्रपटगृहात जाऊन बघता आला नव्हता. पण, आता त्यानं तो घरबसल्या (काही वेळा उभ्याने, काही वेळा उड्या मारत पाहिला) व्यंकू ढोमेचा पहिला सुपरहिट चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ “, असे म्हणत हेमंत ढोमेने त्याच्या श्वानाचा पहिलाच चित्रपट असल्याचे म्हटले आहे.
हेमंतच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करीत चित्रपटाचे कौतुक केले आहे. “खरं सांगायचं तर व्यंकूचा डेब्युट चित्रपट होता. म्हणूनच बघायला गेले होते”, “आम्ही बघितला, सगळ्याचं कौतुक करावं तितकं कमीच, खूप छान अभिनय”, “भावा आणि वहिनी इथून पुढच्या प्रत्येक सिनेमात व्यंकू ढोमे पाहुणा कलाकार म्हणून बघायला आवडेल”, “आम्ही चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहिला. मला खूप आवडला. मी सिनेमा पाहून लगेच माझ्या दोन्ही भावांना फोन केला आणि सांगितलं ‘फसक्लास दाभाडे’ बघा. हा आपला चित्रपट आहे”, “सुंदर चित्रपट”, असे म्हणत अनेकांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे.



दरम्यान, तायडी, सोनू व पप्पू यांची ही गोष्ट आता प्रेक्षकांना घरबसल्या बघता येणार आहे. २४ जानेवारी २०२५ ला फसक्लास दाभाडे हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. एक महिन्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता चित्रपटगृहानंतर ओटीटीवर या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.