२०१९ मध्ये अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘हॉस्टेल डेज’ (Hostel daze) ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. अगदी नावाप्रमाणे, या सीरिजमध्ये हॉस्टेलला राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे आयुष्य रंजक पद्धतीने दाखवण्यात आले होते. तरुणांमध्ये विशेषत: कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या मुलांमध्ये ही सीरिज प्रसिद्ध झाली होती. टिव्हीएफ या डिजीटल कंपनीमधील कलाकारांनी मिळून या सीरिजची निर्मिती केली आहे. पहिल्या दोन सीझनला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आता निर्माते सीरिजचा तिसरा सीझन घेऊन येत आहेत. नुकताच या सीरिजचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला.
अहसास चन्ना, लव विसपुते, शुभम गौर, निखिल विजय, आयुषी गुप्ता आणि आदर्श गौरव अशी स्टारकास्ट या सीरिजला लाभली आहे. सीरिजच्या पात्रांमध्येही फेरफार करण्यात आला आहे. या सीरिजच्या पहिल्या दोन सीझन्समध्ये ‘अंकित’ हे महत्त्वपूर्ण पात्र आदर्श गौरवने साकारले होते. या ट्रेलरवरुन यंदाच्या सीझनमध्ये ही भूमिका आदर्शच्या ऐवजी उत्सव सरकार हा अभिनेता साकारत असल्याचे लक्षात येते. निर्मात्यांच्या या निर्णयावर चाहते नाराज झाले आहेत. तिसऱ्या सीझनमध्ये या व्यतिरिक्तही बरेचसे बदल केल्याचे ट्रेलरमध्ये दिसते.
या सीरिजची खासियत अशी की, याच्या प्रत्येक भागामध्ये एक अनुभवी कलाकार शिक्षक, सिनिअर किंवा वॉर्डन अशा सहाय्यक व्यक्तिरेखा साकारताना दिसतो. अशीच एक भूमिका दिवंगत अभिनेते, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी साकारली असल्याचे ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. या सीरिजच्या माध्यमातून ते शेवटचे ऑनस्क्रीन काम करताना दिसणार आहेत. त्याच्या आजूबाजूला हॉस्टेल किंवा कॉलेजच्या बाहेर असणाऱ्या चहाच्या टपरीचा सेटअप दिसतो.
आणखी वाचा – ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाबद्दल नेटकऱ्याची खोचक कमेंट, आस्ताद काळेने मांडले स्पष्ट मत
२१ सप्टेंबर रोजी राजू श्रीवास्तव यांचे नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयामध्ये निधन झाले. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ‘हॉस्टेल डेज’द्वारे निर्मात्यांनी राजू यांना मानवंदना देण्याचा प्रयत्न केला आहे.