IC 814 The Kandahar Hijack ANI Sues Netfilx for using their Footage : नेटफ्लिक्सवर नुकतीच प्रदर्शित झालेली वेब सीरिज आयसी ८१४ : दी कंदहार हायजॅक आता नव्या वादात अडकली आहे. या सीरिजमधील दहशतवाद्यांच्या नावावरून सुरू झालेला वाद शमलेला नाही तोच नेटफ्लिक्समोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने नेटफ्लिक्स व सीरिजच्या निर्मात्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एएनआयने नेटफ्लिक्सवरील या सीरिजचे चार एपिसोड हटवण्याची मागणी केली आहे. एएनआयने म्हटलं आहे की, “या सीरिजच्या निर्मात्यांनी त्यांची परवानगी न घेता त्यांचा कॉन्टेंट (व्हिडीओ फूटेज) वापरला आहे”. एएनआयच्या वकिलांच्या हवाल्याने रॉयटर्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘आय सी ८१४ : कंदहार हायजॅक’ ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यापासून देशभर चर्चेत आहे. या सीरिजमधील दहशतवादी पात्रांच्या नावावरून मोठा गोंधळ चालू असतानाच आता एएनआयने या सीरिजचे निर्माते व नेटफ्लिक्सविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

या सीरिजमुळे भारतीयांच्या मनावर झालेली जुनी जखम पुन्हा एकदा ताजी झाली आहे. २४ डिसेंबर १९९९ रोजी इंडियन एअरलाईन्सच्या एका विमानाने नेपाळची राजधानी काठमांडूहून दिल्लीसाठी उड्डाण केलं होतं. मात्र या विमानात पाच दहशतवादी बंदुका व दारुगोळा घेऊन बसले होते. विमानाने काठमांडूहून उड्डाण केल्यानंतर ४० मिनिटांनी त्या दहशतवाद्यांनी विमान ताब्यात घेतलं. हे पाचही दहशतवादी विमान घेऊन अमृतसर, लाहोर, दुबई असा प्रवास करून तालिबान नियंत्रित अफगाणिस्तानमधील कंदहारला जाऊन थांबलं. दहशतवाद्यांनी कंदहारमध्ये आठ दिवस विमान ताब्यात ठेवलं होतं व विमानातील प्रवाशांना ओलिस ठेवलं होतं. या आठ दिवसांत त्यांनी भारत सरकारशी वाटाघाटी करून विमानातील प्रवाशांना मुक्त करण्याच्या बदल्यात भारताच्या ताब्यात असलेले दहशतवादी मसूद अझहर, ओमार शेख आणि मुश्ताक अहमद यांना सोडवलं.

हे ही वाचा >> वडिलांचा तो सल्ला अन् ‘मिर्झापूर ३’मधील इंटिमेट सीन; ‘सलोनी भाभी’ म्हणाली, “मला वाटलं की हे…”

एएनआयचा आरोप काय?

दरम्यान, एएनआयने नेटफ्लिक्स व सीरिजच्या निर्मात्यांविरोधात याचिका दाखल केली आहे. याबाबत एएनआयचे वकील सिद्धांत कुमार म्हणाले, “सीरिजच्या निर्मात्यांनी एएनआयचा ट्रेडमार्क वापरला आहे. या सीरिजवर सर्व स्तरातून टीका होत आहे आणि त्यामुळे आमचा ट्रेडमार्क बदनाम होत आहे. त्यामुळे आमच्या वृत्तसंस्थेला वाटतं की नेटफ्लिक्सने ते एपिसोड हटवावेत ज्यामध्ये एएनआयचं फूटेज वापरण्यात आलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आमची याचिका स्वीकारली आहे, तसेच नेटफ्लिक्सकडे उत्तर मागितलं आहे. नेटफ्लिक्सने तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, जनरल परवेज मुशर्रफ व दहशतवादी मसूद अझरहसह इतर काही फूटेज वापरलं आहे, जे एएनआयचं आहे. हे फूटेज वापरताना त्यांनी आमची परवानगी घेतली नव्हती”.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ic 814 the kandahar hijack ani files case against netflix over trademark footage asc