अभिनेता जयदीप अहलावतला ‘पाताल लोक’ वेब सीरिजमुळे खूप प्रसिद्धी मिळाली. या सीरिजमधील जयदीपच्या दमदार अभिनयामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले. आता लवकरच या अभिनेत्याच्या ‘पाताल लोक’ वेब सीरिजचा दुसरा भाग येणार आहे. १७ जानेवारी २०२४ रोजी ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. पण त्या आधी अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अभिनेत्याची बहुचर्चित वेब सीरिज प्रदर्शित होण्याआधीच त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे.
जयदीपचे वडील दयानंद अहलावत यांचे सोमवारी (१३ जानेवारी २०२४ रोजी) मुंबईत निधन झाले. अभिनेत्याच्या टीमने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “जयदीप अहलावत यांचे प्रिय वडील आता आपल्यात नाहीत, याची माहिती देताना आम्हाला खूप दुःख होत आहे. त्यांनी कुटुंबाच्या आणि आपल्या प्रियजनांच्या सहवासात शेवटचा श्वास घेतला. जयदीप आणि त्यांचे कुटुंब या कठीण प्रसंगाचा सामना करत आहेत, त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात गोपनीयता राखावी ही विनंती आहे. आम्ही तुमच्या सहकार्याबद्दल आणि प्रार्थनांसाठी आभारी आहोत.”
हेही वाचा…Baby John Ott Release : वरूण धवनचा ‘बेबी जॉन’ ओटीटीवर पाहता येणार, कुठे आणि कधी? जाणून घ्या
जयदीप अहलावतचा जन्म हरियाणामध्ये झाला आणि शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) येथे अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, त्याचे वडील नेहमीच त्याच्या अभिनय क्षेत्रातील स्वप्नांना पाठिंबा देत. जयदीप म्हणाला होता, “जेव्हा मी वडिलांना सांगितले की मला अभिनय शिकायचा आहे, तेव्हा त्यांनी मला नकार दिला नाही. ते म्हणाले, ‘काय होईल? फार तर काय, तो अपयशी ठरेल आणि शेती करेल,’” असे जयदीपने नमूद केले.
‘पाताल लोक’ प्रदर्शित झाल्यानंतर जयदीपने त्याच्या वडिलांबरोबर फोटो पोस्ट करत एक आठवण शेअर केली होती. याला कॅप्शन देत त्याने लिहिले होते की, “तुझाच तर अंश आहे मी, मग तुझ्यासारखाच तर होईन ना!” पुढे जयदीपने लिहिले होते “डिट्टो बाऊजींची कॉपी आहे हातीराम चौधरी.” बब्बू आपला स्टड लोंडा आहे!”
हेही वाचा…या आठवड्यात OTT वर रिलीज होणाऱ्या कलाकृतींची यादी, वाचा…
जयदीप अहलावतने ‘महाराज’, ‘जाने जान’, ‘थ्री ऑफ अस’, ‘संदीप और पिंकी फरार’, ‘राजी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. २०२० च्या ‘पाताल लोक’ या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.