संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’मध्ये झळकलेला जेसन शाह ही सीरिज प्रदर्शित झाल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. जेसनने त्याचे व अभिनेत्री अनुषा दांडेकरचे ब्रेकअप का झाले होते, यामागचे कारण काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यानंतर आता त्याने त्याच्या आयुष्यातील काही व्यसनांबद्दल खुलासा केला आहे. दारू आणि धूम्रपानाचे व्यसन त्याला होते. तसेच त्याला सेक्सचे व्यसन होते आणि हे व्यसन सोडणे खूप कठीण होते असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं.
“मी दारू प्यायचो. तसेच दिवसाला अडीच पाकिटे सिगारेट ओढायचो. इतकेच नाही तर मला स्त्रियांचे व्यसन होते. हे सेक्सचे व्यसन सोडवणे माझ्यासाठी खूप कठीण होते,” असं जेसन ‘शार्दुलॉजी’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. तो यातून कसा बाहेर पडला असं विचारल्यावर जेसन देवाचा उल्लेख केला. “देवाची कृपा व प्रेमामुळे मी या सर्व व्यसनातून बाहेर पडलो,” असं जेसन म्हणाला.
हे व्ससन सोडणं सोपं नव्हतं, असं त्याने सांगितलं. “हे अजिबात सोपं नाही, खूप कठीण आहे कारण तुम्हाला त्या गोष्टीसाठी नाही म्हणायचं आहे. जर एखादी गोष्ट चांगली वाटत असेल तर ती करा, असा सल्ला खूप जण देतात. पण आता मला समजलंय की हा कदाचित सर्वात वाईट सल्ला आहे. मी यामुळेच आयुष्यातील सर्वात वाईट निर्णय घेतले होते, कारण ते करणं मला चांगलं वाटत होतं. पण आता मी म्हणेन की जर तुम्हाला एखादी गोष्ट चांगली वाटतेय, तरीही ती करण्यापूर्वी विचार करा,” असा सल्ला जेसनने दिला.
व्यसनाची जाणीव कधी झाली?
सेक्सचे व्यसन लागले आहे ते कसं समजलं याबद्दल जेसन म्हणाला, “२०२१ च्या नवीन वर्षाच्या संध्याकाळी मी एका मित्राच्या घरी होतो आणि मी नेहमीप्रमाणेच एक मुलगी जाताना पाहिली. तिला दुखावल्याचं मला वाईट वाटलं. मला खरंच खूप लाज वाटत होती आणि खूप अपराधीपणा वाटत होता आणि त्यामुळे मला खूप एकटं वाटू लागलं.” यानंतर जेसनचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला आणि आयुष्यात इतरही बऱ्याच गोष्टी आहेत, यावर त्याचा विश्वास बसला, नंतर त्याने बदलायचं ठरवलं. “मी जसे आयुष्य जगत होतो त्यापेक्षा जीवनाचा हेतू आणखी वेगळा आहे, यावर माझा विश्वास बसला आणि तिथेच मला समजलं की प्रसिद्धी, पैसा याचा काही फरक पडत नाही, कारण ते क्षणभर असतात,” असं जेसनने नमूद केलं.
जेसन शाहने घेतला मोठा निर्णय
या सर्व अनुभवांनंतर एक मोठा निर्णय घेतल्याचं जेसनने सांगितलं. “आता लग्नाआधी सेक्स करायचा नाही असं मी ठरवलं आहे. कारण तुम्ही एखाद्या स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवल्यावर तुम्ही दोघेही एकमेकांमध्ये भावनिकरित्या गुंतून जाता, मग तिथे लॉजिक नसतं. तुमचं नातं भावनांवर आधारित असतं आणि तेच नंतर अडचणीचं ठरतं,” असं जेसन म्हणाला.