‘ब्रीद : इनटू द शॅडोज’ (Breathe: into the shadows) या अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरील वेब सीरिजला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. यामध्ये अभिषेक बच्चन, नित्या मेनन, अमित साध आणि सैयामी खेर हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये होते. २०२० मध्ये ही सीरिज प्रदर्शित झाली होती. या लोकप्रिय सीरिजद्वारे अभिषेक बच्चनने ओटीटी विश्वामध्ये पदार्पण केले. एकाच वेळी दुहेरी भूमिका केल्याने त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. अभिषेकचे चाहते या सीरिजच्या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

या सीरिजचा ट्रेलरदेखील नुकताच प्रदर्शित केला गेला आहे. ऍक्शन सीक्वेन्सने भरपूर अशा या ट्रेलरमध्ये अभिषेक बच्चनचं पात्र उर्वरित ६ बळी मिळवण्यासाठी परत आलं आहे. प्रेक्षक अभिषेकच्या या नव्या भूमिकेसाठी उत्सुक आहेत, पण अभिषेकची आई म्हणजेच जया बच्चन या मात्र या सीरिज पाहण्यासाठी अजिबात उत्सुक नाहीत. इंडिया टूडेशी संवाद साधताना अभिषेक बच्चनने याविषयी खुलासा केला.

आणखी वाचा : …म्हणून मिलिंद सोमणने आमिर खानबरोबरचा तो चित्रपट सोडला होता अर्धवट, जाणून घ्या कारण?

अभिषेक म्हणाला, “खरं सांगायचं झालं तर आम्ही एक उत्तम थ्रिलर कथानक लोकांसमोर आणलं आहे. पण माझ्या आईलाच ते बघण्याची इच्छा नाहीये. तिला या हिंस्र गोष्टी आवडत नाहीत, अशा गोष्टींची तिला खूप भीती वाटते. या अशा हिंसक गोष्टी बघण्यापेक्षा माझी आई संसदेत जाणं पसंत करेल.” पण अमिताभ मात्र यांना अभिषेकची ही सीरिज चांगलीच आवडली आहे आणि याचा पहिला सीझन त्यांनी सलग पाहिला होता हेदेखील अभिषेकने स्पष्ट केलं आहे.

दिग्दर्शक मयंक शर्मा यांनी अर्शद सय्यद, विक्रम तुली, प्रिया सग्गी आणि अभिजित देशपांडे यांच्यासोबत ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’च्या नवीन सीझनचे सह-लेखन केले आहे. ‘ब्रीद: इनटू द शॅडो सीझन २’ ९ नोव्हेंबर रोजी २४० देशात प्रसारित होणार आहे. अभिषेक बच्चनच्या या नवीन सीरिजसाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत.

Story img Loader