बिहार आणि तिथलं गुन्हेगारी विश्व यांची बॉलिवूडला कायम भुरळ पडते. बीमल रॉय, सुधीर मिश्रा, राम गोपाल वर्मा पासून प्रकाश झापर्यंत कित्येक दिग्दर्शकांनी बिहारचं वेगवेगळं चित्रण केलं आहे. अनुराग कश्यपनेसुद्धा ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधून एक जबरदस्त गोष्ट लोकांपुढे मांडली. नुकतंच नीरज पांडेनेही ‘खाकी – द बिहार चॅप्टर’ या वेबसीरिजमधून आयपीएस अमित लोढा यांची गोष्ट मांडली. आता याच धर्तीवर आणखी एक वेबसीरिज येऊ घातली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकताच या वेबसीरिजचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सीरिजचं नाव आहे जहानाबाद. या टीझरमध्ये सुरुवातीला २ माणसं मोटरसायकलवर महेंद्र सिंग धोनीविषयी चर्चा करत आहेत, त्यानंतर थोड्यावेळाने त्यांचा विषय धोनीच्या जातीवर येऊन अडतो. अशी चर्चा सुरू असताना ते त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचल्यावर मोटर सायकलवर मागे बसलेला एक माणूस पिशवीतून एक बॉम्ब काढून जवळच्या एका आवारात फेकतो.

आणखी वाचा : दीपिकावर टीका करणाऱ्या विवेक अग्निहोत्रींच्या मुलीचाच भगव्या बिकिनीतील फोटो व्हायरल; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

मोठा ब्लास्ट होतो, तो पाहून फाटकामधून काही पोलिस अधिकारी बाहेर येतात, तर रस्त्यावर एक पिशवी पडलेली त्यांना आढळते, ती पिशवी उघडून बघतात तर त्यात एका मेलेल्या माणसाचं मुंडकं कापून ठेवलेलं आढळतं. ही वेबसीरिज २००५ च्या बिहारमधील काही सत्यघटनांवर आधारित असल्याचं स्पष्ट होत आहे. हा टीझर पाहून लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

दिग्दर्शक हंसल मेहता यांनीसुद्धा याचा हा टीझर शेअर करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. सुधीर मिश्रा या वेबसीरिजचे कर्ताधर्ता आहेत. तर राजीव बेरनवाल आणि सत्यांशू सिंग यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. शिवाय ऋत्विक भौमिक, हर्षिता गौर, परमब्रत चट्टोपाध्याय, रजत कपूरसारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही वेबसीरिज सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jehanabad upcoming webseries based on real life incidents in bihar criminal world on sony liv avn