सध्या चित्रपटगृहांना टक्कर द्यायला एक मोठा स्पर्धक बाजारात आला आहे तो म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म. कोविड काळात भारतीयांनी या ओटीटी प्लॅटफॉर्मचा पुरेपूर वापर केला आणि त्यानंतरच आपल्या देशात वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा सुळसुळाट झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आता यात अंबानी यांच्या जिओनेही उडी घेतली आहे. बऱ्याच दिवसांपासून जिओ नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करणार असल्याची चर्चा होती, अखेर त्यांनी नुकतंच या प्लॅटफॉर्मचे नवे प्लान जाहीर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाची आयपीएल फुकटात दाखवून जिओने लोकांना त्यांचं ‘जिओ सिनेमा’ हे ॲप डाउनलोड करायला भाग पाडलं आणि भरपूर क्रिकेटप्रेमींनी ते डाउनलोडही केलं. आता याच ॲपच्या माध्यमातून ‘जिओ सिनेमा प्रीमियम’ या नावाखाली आलेल्या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे प्लॅन जिओने नुकतेच लॉंच केले आहेत.

आणखी वाचा : दूरदर्शनने माधुरी दीक्षितच्या ‘चोली के पीछे’ गाण्यावर घातली होती बंदी; ‘हे’ होतं कारण

फिफा, आयपीएल पाठोपाठ जिओच्या या प्लॅटफॉर्मवर HBO आणि WB (Warner Bros) या दोन्ही हॉलिवूड स्टुडिओजचे चित्रपट आणि वेबसीरिजही लोकांना पाहता येणार आहेत. यासाठी जिओ प्रीमियमचा एक वेगळा प्लॅन त्यांनी लॉंच केला आहे. वर्षाला ९९९ रुपये भरून लोकांना हा प्लॅन घेता येणार आहे आणि याबरोबरच ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सगळा कंटेंट पाहायला मिळणार आहे.

‘डिज्नी प्लस हॉटस्टार’ या प्लॅटफॉर्मबरोबरचा ‘HBO’ने केलेला करार संपल्यावर त्यांच्या सगळ्या वेबसीरिज आणि चित्रपट जिओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवर दाखवणार असल्याची चर्चा बरेच दिवस सुरू होती. ‘द वायर’, ‘गेम ऑफ थ्रोन्स’ आणि ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’सारख्या बऱ्याच वेबसीरिज आता तुम्हाला ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहेत.

या नवीन प्लॅटफॉर्मवर ९९९ रुपये भरूनही बरेच चित्रपट या प्लॅटफॉर्मवर दिसत नसल्याने काही लोक निराश आहेत. त्यांनी सोशल मीडियावर जिओला टॅग करत “जिओ आपल्याला मूर्ख बनवत आहे”असं मत मांडलं आहे. ही सुरुवात असल्याने येणाऱ्या काळात आणखी चित्रपट आणि वेबसीरिज जिओ प्रेक्षकांसाठी घेऊन येईल असं सांगितलं जात आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio cinema premium plan launched do you know what it offers under ott platform avn