JioStar: आजपासून तुम्हाला जिओ सिनेमा व डिस्ने+हॉटस्टार हे दोन अॅप वापरावे लागणार नाहीत. वायकॉम 18 व स्टार इंडियाच्या करारानंतर आता हे दोन्ही अॅप विलीन झाले असून आता तुम्हाला जिओ हॉटस्टार या अॅपवर सर्व कंटेंट पाहता येईल. आज शुक्रवारी (१४ फेब्रुवारीला) हे दोन्ही अॅप मर्ज करण्यात आले.
डिस्ने+हॉटस्टारचा लोगो व नाव दोन्ही बदलण्यात आलं आहे. तुम्ही हे अॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे झालेले बदल पाहायला मिळतील. डिस्ने+हॉटस्टार व जिओ सिनेमावरील सर्व कंटेंट आता तुम्हाला एकाच अॅपमध्ये पाहता येईल. दोन्ही अॅप वापरण्याची गरज नसेल, व दोन्ही अॅपचे तुम्हाला सबस्क्रिप्शनही घ्यावे लागणार नाही.
जिओहॉटस्टारच्या बेसिक प्लॅनसाठी खर्च किती?
कंपनीच्या निवेदनानुसार, जवळपास ३ हजार तासांचा कंटेंट, स्पोर्ट्स लाइव्ह स्ट्रीमिंग व ५० कोटींहून जास्त युजर असलेला हा प्लॅटफॉर्म आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहे. वेगवेगळ्या युजर्सच्या गरजा ओळखून त्यानुसार मेंबरशीप प्लॅन्स कंपनीने आणले आहेत. जिओहॉटस्टारच्या मेंबरशीपच्या बेसिक प्लॅनसाठी तुम्हाला १४९ रुपये मोजावे लागतील. जिओ सिनेमा व डिस्ने+हॉटस्टारचे युजर्स त्यांचे विद्यमान सबस्क्रिप्शन प्लॅन्स जिओहॉटस्टारमध्ये अॅक्टिव्हेट करू शकतील.
![hotstar jio cinema merger JioHotstar logo](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/hotstar-jio-cinema-merger-JioHotstar-logo-1.jpg?w=830)
जिओहॉटस्टारवर आता फक्त बॉलीवूड, दाक्षिणात्य कलाकृती व प्रादेशिक चित्रपटच नाही तर हॉलीवूडमधील सर्वोत्तम कलाकृतीही तुम्हाला पाहता येतील. यामध्ये डिस्ने, एनसीबी युनिव्हर्सल पिकॉक, वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी एचबीओ व पॅरामाउंट यांचा समावेश असेल. हे सगळं तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर पाहता येईल, असं कंपनीने म्हटलं आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, बीसीसीआय, आयसीसीच्या क्रिकेट स्पर्धा, प्रीमियर लीग, विम्बल्डनसह प्रो कबड्डी आणि इंडियन सुपर लीगसारख्या (ISL) देशांतर्गत स्पर्धा देखील जिओहॉटस्टारवर प्रसारित केल्या जातील.
जिओस्टारच्या डिजिटल विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण मणी म्हणाले, “जिओहॉटस्टारकडो एक दमदार दृष्टिकोन आहे, तो म्हणजे प्रीमियम मनोरंजन खऱ्या अर्थाने सर्व भारतीयांपर्यंत पोहोचवणे. मनोरंजन आता काही विशिष्ट लोकांपुरते मर्यादित नाही तर सर्व भारतीयांसाठी उपलब्ध आहे. एआय-आधारित अनेक शिफारशींवर काम करून हे अॅप १९ पेक्षा जास्त भाषांमध्ये स्ट्रीमिंग उपलब्ध करून दिलं आहे.”