८० आणि ९० च्या दशकात मुंबईत फक्त अंडरवर्ल्डची चलती होती. रुपेरी पडद्यापासून ते ओटीटीपर्यंत गुंडगिरी आणि अंडरवर्ल्डच्या अनेक कथा आपण पाहिल्या आहेत. त्यात आता ‘बंबई मेरी जान’ या वेब सीरिजचे नाव जोडले गेले आहे, ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. एक कर्तव्यदक्ष आणि इमानदार पोलिस अधिकारी आणि त्याच्याच घरातील गुंडगीरीच्या मार्गाला लागलेला मुलगा अशी ही कहाणी या सीरिजमधून उलगडली जाणार आहे.
फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटनेमेंटची निर्मिती असलेली ही वेब सीरिज काल्पनिक असल्याचा दावा केला जात आहे, परंतु ट्रेलर पाहून ही सीरिज कुख्यात गँगस्टार दाऊद इब्राहिमच्या आयुष्यावर बेतलेली असल्याचं जाणवत आहे. ‘बंबई मेरी जान’ची कथा प्रसिद्ध लेखक आणि ८०-९० च्या दशकातील अंडरवर्ल्डचा कारभार जवळून पाहणारे क्राइम रिपोर्टर एस हुसैन झैदी यांनी लिहिली आहे.
आणखी वाचा : “माझी भूमिका उत्तम पण…” ‘ड्रीम गर्ल २’मधील भूमिकेच्या लांबीविषयी परेश रावल यांचं वक्तव्य
वेब सीरिजचा ट्रेलर आणि त्यातील डायलॉगबाजीमुळे एक वेगळाच थरार आपल्याला अनुभवायला मिळणार असल्याचं स्पष्ट होत आहे. अभिनेता के के मेनन सीरिजमध्ये मुख्य पोलिस अधिकाऱ्याची भूमिका निभावत आहे. तर अविनाश तिवारी याने त्यांच्या मुलाची भूमिका साकारली आहे. यांच्याबरोबरच कृतिका कामरा, निवेदिता भट्टाचार्य आणि अमायरा दस्तूर यांच्याही सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत.
गुन्हेगरी विश्वावर बेतलेल्या या वेब सीरिजमध्ये बाप आणि त्याच्या मुलाच्या नात्याची गोष्टही आपल्याला पाहायला मिळणार आहे. १० भागांची ही वेब सीरिज ‘प्राइम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १४ सप्टेंबरपासून प्रसारित होणार आहे. ही सीरिज तमिल, तेलुगू, मलयालम, कन्नडसह इतरही काही परदेशी भाषांमध्ये पाहता येणार आहे. शुजात सौदागर यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे.