अभिनेता अमेय वाघ हा मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. मराठी नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एवढंच नाही तर तो सध्या हिंदी वेब सीरिजमध्ये दमदार काम करताना दिसत आहे. असा हा चौफेर मुशाफिरी करणारा अमेय वाघ लवकरच चित्तथरारक वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.
लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माते आशुतोष गोवारीकर आणि मोना सिंह स्टारर ‘काला पानी’ या वेब सीरिजमधून अमेय प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही सीरिज १८ ऑक्टोबर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याच सीरिजचे चित्रीकरण अंदमानमध्ये झालं होतं. नुकतंच अमेय वाघने एका मुलाखतीमधून अंदमानमधील चित्रीकरणाचा हा अनुभव सांगितला.
हेही वाचा – “हिंदू हा धर्म नाही, ही जगण्याची…,” अध्यात्माविषयी बोलताना मिलिंद गवळींचं वक्तव्य, म्हणाले…
‘राजश्री मराठी’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलशी बोलताना अमेय म्हणाला, “अंदमानमध्ये चित्रीकरण करण्याचा अनुभव खूप भारी आहे. अंदमानला फिरायला जाणं, हनिमूनला जाणं या वेगळ्या गोष्टी आहेत आणि चित्रीकरणाला जाणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. तिथे निसर्ग सौंदर्य एवढं आहे की, अर्थातच तिकडे गेल्या गेल्या तुमचे डोळे दिपतात. असं वाटतं हे सगळं किती सुंदर आहे.”
हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिका बंद होणार का? अभिनेते मिलिंद गवळी म्हणाले…
“आम्ही तिथे १२.३० आणि १.०० वाजतच्या उन्हात उभं राहून चित्रीकरण केलं आहे. शिवाय जंगलात, जिथे टॉयलेट वगैरे आजूबाजूला काही नाहीये अशा ठिकाणी चित्रीकरण केलं आहे. कॅमेराचा जो मॉनिटर असतो त्याच्यावरती साप वळवळताना पाहिलं आहे. मुंबईत कुत्री जशी शॉटच्या मधेच येतात तसंच तिथे साप येतात,” असा अंदमानमधील चित्रीकरणाचा अनुभव अमेयने सांगितला.
दरम्यान, ‘काला पानी’ या वेब सीरिजमध्ये आशुतोष गोवारीकर, मोना सिंह, अमेय वाघ व्यतिरिक्त आणखी एक लोकप्रिय मराठी कलाकार पाहायला मिळणार आहे. हा लोकप्रिय मराठी कलाकार म्हणजे चिन्मय मांडलेकर. चिन्मय पुन्हा एकदा नव्या भूमिकेत या सीरिजमध्ये झळकणार आहे.