Kapil Sharma Atlee Kumar: ‘बेबी जॉन’ चित्रपटाच्या टीमने नुकतीच कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली. वरुण धवन, कीर्ती सुरेश, वामिका गब्बी आणि दिग्दर्शक ॲटली कुमार यांच्याशी कपिलने विविध विषयांवर गप्पा मारल्या. याच एपिसोडमध्ये कपिलने ॲटलीला एक प्रश्न विचारला, ज्यावरून सोशल मीडियावर टीका होत आहे. कपिलने हा प्रश्न विचारताना ॲटलीच्या लूकवर कमेंट केली, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. यावर आता कपिलने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

कपिलने ॲटलीला विचारलं, “आता तू मोठमोठ्या निर्मात्यांबरोबर, कलाकारांबरोबर काम करत आहे. त्यामुळे जेव्हा तू एखाद्या स्टारला पहिल्यांदा भेटायला जातो, तेव्हा ॲटली कुठे आहे? असं ते विचारतात का.” यावर ॲटली म्हणाला, “तुमचा प्रश्न मला समजला. मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ए.आर. मुरुगदास सरांचा मी खरोखर आभारी आहे, कारण त्यांनी माझ्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. त्यांनी स्क्रिप्ट मागितली, पण मी कसा दिसतोय किंवा मी ते करण्यास सक्षम आहे की नाही हे त्यांनी पाहिलं नाही. त्यांना कथा आवडली. त्यामुळे जगानेही लोकांकडे तसंच पाहावं. तुम्ही कसे दिसता, यावरून तुमच्याबद्दल मतं तयार होऊ नये.”

हेही वाचा – रश्मिका मंदानाने १३ वर्षांनी मोठ्या ‘या’ अभिनेत्याशी केलेला साखरपुडा; ब्रेकअपनंतर आता कसं आहे दोघांचं नातं? जाणून घ्या

कपिल शर्माची व्हायरल क्लिपवर प्रतिक्रिया

कपिलच्या शोमधील ही क्लिप अनेक सोशल मीडिया युजर्सनी शेअर केली आहे. कपिल शर्माने अॅटलीचा लूकवरून अपमान केला? आणि त्याने सडेतोड उत्तर दिलं, असं कॅप्शन देत एका युजरने ही क्लिप शेअर केली आहे. ती पोस्ट रिपोस्ट करत कपिलने लिहिलं, “प्रिय सर, मी या व्हिडीओमध्ये केव्हा आणि कुठे त्याच्या लूक्सबद्दल बोललो हे तुम्ही मला सांगू शकता का? कृपया सोशल मीडियावर द्वेष पसरवू नका. धन्यवाद.” याच पोस्टमध्ये कपिल लोकांना म्हणाला, “तुम्ही स्वतः एपिसोड पाहा आणि ठरवा. मेंढरासारखे कोणाचेही ट्विट फॉलो करू नका.”

हेही वाचा – मुकेश खन्ना यांचा शत्रुघ्न सिन्हांच्या संस्कारावर प्रश्न; भडकलेली सोनाक्षी सिन्हा म्हणाली, “यापुढे काही बोलाल…”

दरम्यान, अॅटली कुमार ‘बेबी जॉन’चा दिग्दर्शक व सहनिर्माता आहे. ‘बेबी जॉन’ हा त्याच्या सुपरहिट चित्रपट ‘थेरी’चा हिंदी रिमेक आहे. ‘थेरी’मध्ये थलपती विजय मुख्य भूमिकेत होता. ‘बेबी जॉन’ मध्ये वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil sharma reply user claiming he insulted atlee look in his show watch video hrc