‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनची नुकतीच सुरुवात झाली असून बॉलिवूडची सुपरहीट जोडी दीपिका पदूकोण आणि रणवीर सिंग यांनी याच्या पहिल्या भागात हजेरी लावली. या भागात या दोघांनी आपापल्या लव्ह लाईफविषयी बरेच खुलासे केले आहेत. याबरोबरच या भागात दीपिकाने तिच्या डिप्रेशनमधील दिवसांची आठवण काढत तिने यावर कशी मात केली यावरही भाष्य केलं आहे.
याबरोबरच दीपिकाल नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी रणवीरने नेमकी कशी मदत केली याचाही खुलासा तिने केला. एकूणच या भागात या दोघांनी डिप्रेशनबद्दल खुलेपणाने भाष्य केलं. हे पाहून करणनेही त्याचा अनुभव सगळ्यांसमोर शेअर केला. ‘NMACC (नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर)च्या उद्घाटन सोहळ्यादरम्यानच्या एका धक्कादायक घटनेचा करणने खुलासा केला. या सोहळ्यादरम्यानच करणला प्रथम पॅनिक अटॅक आला असल्याचंही त्याने कबूल केलं.
आणखी वाचा : ‘राम-लीला’मधील ‘त्या’ किसिंग सीनबद्दल रणवीर-दीपिकाचा मोठा खुलासा; ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर सांगितला किस्सा
त्याविषयी बोलताना करण म्हणाला, “कोविड नंतरची काही वर्षं माझ्यासाठी फारच कठीण होती, सतत सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगमुळे माझ्यावर परिणाम झाला होता. त्यादिवशी सोहळ्या दरम्यान वरुण धवनच्या ही गोष्ट लक्षात आली अन् त्याने मला नजीकच्या खोलीत नेलं, तेव्हा मला कुठे थोडा श्वास घेता आला, मला हार्ट अटॅक आला होता काय हेदेखील मला समजत नव्हतं. माझे हातपाय लटपटत होते. मी घरी जाऊन माझ्या बेडवर पडलो आणि अक्षरशः ढसाढसा रडलो, मी का रडतोय याचं कारणही मला ठाऊक नव्हतं.”
पुढे करण म्हणाला, “त्यादिवशी मी फारच हतबल झालो होतो. नंतर मी माझ्या डॉक्टरांना भेटून माझ्या नैराश्यावरचे उपचार सुरू केले. अजूनही ते सुरू आहेत, पण तुमच्या आयुष्यातील उतरता काळ आणि त्यामुळे मानसिक स्वास्थ्य यावर होणारा परिणाम या दोन्ही गोष्टी समजून घेण्याची अन् स्वीकारण्याची फार गरज असते.” करणनंतर दीपिकानेही तिचा अनुभव सगळ्यांसमोर शेअर केला. मानसिक स्वास्थ्य हे किती महत्त्वाचं असतं आणि त्याकडे आपण सगळेच फार लक्ष देत नाही यावरही या तिघांनी भाष्य केलं.